

Delhi police woman murder case
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये कार्यरत असलेल्या SWAT कमांडो काजल चौधरी (वय २७) यांचा पश्चिम दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. चार महिन्यांची गरोदर असलेल्या काजल यांना डम्बेलने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तिचा पती अंकुर याला अटक करण्यात आली आहे. तो मंत्रालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे.
२२ जानेवारी रोजी मोहन गार्डन येथील राहत्या घरी पतीने काजलवर जीवघेणा हल्ला केला. पाच दिवस गाझियाबादमधील रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, २७ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. काजलचा भाऊ निखिल हा पोलीस कॉन्स्टेबल आहे, त्याने सांगितले की, ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी तो काजलशी फोनवर बोलत होता. काजल आणि अंकुरला दीड वर्षांचा मुलगा आहे.
निखिलच्या म्हणण्यानुसार, अंकुरने बहिण काजलचा पती अंकुर याने त्याला फोन केला आणि म्हणाला, 'तुझ्या बहिणीला समजावून सांग. मी त्याला शांत राहण्यास सांगितले आणि लगेच बहिणीला फोन केला. ती सहसा आम्हाला जास्त काही सांगत नसे, पण त्या दिवशी ती तिची व्यथा मांडत होती.
आम्ही बोलत असतानाच, ती मला सर्व सांगत आहे या रागातून अंकुरने तिच्याकडून फोन हिसकावून घेतला. त्याने मला कॉल रेकॉर्ड करण्यास सांगितला आणि म्हणाला की याचा पुरावा म्हणून वापर होईल. मी तुझ्या बहिणीला मारतोय. पोलीस माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीत. त्यानंतर मला तिचा ओरडण्याचा आवाज आला आणि फोन कट झाला. त्यानंतर पाच मिनिटांनी अंकुरने पुन्हा फोन करून सांगितले, ती मेली आहे, हॉस्पिटलला या."
काजलच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, अंकुर आणि त्याचे नातेवाईक लग्नानंतर काजलचा छळ करत होते. काजल गर्भवती असतानाही तिला सर्व घरकाम करायला लावले जात असे.
काजलचे वडील राकेश यांनी सांगितले, "आम्ही लग्नात बुलेट बाईक, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दिली होती, तरीही त्यांची मागणी संपली नव्हती." काजलच्या आईने सांगितले की लग्नासाठी त्यांनी २० लाख रुपये खर्च केले होते आणि कर्जही काढले होते. "अंकुरने तिच्याकडून ५ लाख रुपयेही घेतले होते. तो एक राक्षस आहे, मला न्याय हवा आहे," असे त्या म्हणाल्या.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक ताणतणाव आणि कौटुंबिक वादातून ही घटना घडली. २२ जानेवारी रोजी अंकुरने प्रथम काजलचे डोके दरवाजाच्या चौकटीवर आदळले आणि त्यानंतर डंबेलने तिच्यावर हल्ला केला.