

Crime News
झाशी: मेरठमधील निळ्या ड्रम हत्याकांडाच्या घटनेची पुनरावृत्ती झाशीमध्ये घडली आहे. एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला आणि उरलेले अवशेष एका निळ्या पेटीत लपवून ठेवले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. ज्या लोडर ड्रायव्हरला आरोपीने ट्रंकची विल्हेवाट लावण्यासाठी बोलावले होते, त्याला संशय आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.
आरोपीच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, प्रीती सातत्याने पैशांची मागणी करत असल्याने राम सिंह तिला कंटाळला होता. साधारण एका आठवड्यापूर्वी त्याने भाड्याच्या घरातच तिची हत्या केली. त्यानंतर त्याने १६ वर्षांच्या मुलाच्या मदतीने मृतदेह एका मोठ्या निळ्या ट्रंकमध्ये ठेवला आणि तो जाळला. हा ट्रंक त्याने खास याच कामासाठी विकत घेतला होता.
शनिवारी उशिरा राम सिंहने त्या ट्रंकची विल्हेवाट लावण्याचे ठरवले आणि एक लोडर बोलावला. त्याने ड्रायव्हरला ती ट्रंक सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने नेण्यास सांगितले आणि स्वतः लोडरचा पाठलाग करू लागला. वाटेतच राम सिंह अचानक गायब झाला, ज्यामुळे लोडर ड्रायव्हरला संशय आला. त्याने तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी ट्रंक उघडली असता त्यात राख, कोळशाचे तुकडे आणि जळलेल्या हाडांचे काही अवशेष सापडले.
फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून नमुने गोळा केले आहेत. पोलीसांनी लेहर गावातील त्या घरामधे जाऊन पाहणी केली असता, तिथे मातीची चूल, लाकूड आणि कोळसा सापडला, ज्याचा वापर मृतदेह जाळण्यासाठी केला असावा असा संशय आहे. घरामध्ये एक निळा ड्रमदेखील आढळून आला.
"प्रीती वारंवार पैशांची मागणी करत असल्याने तिची हत्या केल्याची कबुली राम सिंहने आपल्या दुसऱ्या पत्नीकडे दिली होती. हाडांचे काही भाग वगळता मृतदेहाची पूर्णपणे राख झाली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात त्याच्या मुलानेही मदत केल्याचा संशय आहे." आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.