

बिजनौर : 'ऑफिसमध्ये दररोज आलीस तर ५ हजार रूपये देईन' असे म्हणत एका सरपंच पतीने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील मंडावर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मंडावर परिसरातील एका गावात राहणाऱ्या पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जानेवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास तिची १७ वर्षीय मुलगी काही कामानिमित्त बिजनौर येथे जाण्यासाठी गावाबाहेरील बस स्थानकावर उभी होती. यादरम्यान, गावातील सरपंचाचा पती तिथे कार घेऊन आला. त्याने पीडित मुलीला बिजनौरला सोडतो, असे सांगून कारमध्ये बसवले.
कारमध्ये बसल्यानंतर आरोपीने मुलीशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. वारंवार नकार देऊनही आरोपी थांबला नाही आणि त्याने मुलीचा मोबाईल फोनही हिसकावून घेतला, जेणेकरून ती कोणाशीही संपर्क साधू शकणार नाही. त्यानंतर तो तिला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिला पैशांचे आमिष दाखवून दबाव टाकला. त्याने म्हटले की, "तू येथे रोज येत जा, मी तुला दररोज ५००० रुपये देईन." जेव्हा मुलीने याला विरोध केला, तेव्हा त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
मुलीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि तहसीलमध्ये जाऊन आपले काम पूर्ण केले. त्यानंतर ती सुरक्षित घरी पोहोचली आणि सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीशी संबंधित या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आणि कायद्याने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे. पीडितेची ओळख गोपनीय ठेवून संवेदनशीलतेने तपास केला जात आहे. तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.