

Crime News
नवी दिल्ली: पश्चिम दिल्लीतील टिळक नगर भागात बुधवारी संध्याकाळी एका २१ वर्षीय तरुणीची तिच्याच घरात चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुस्कान असे मृत तरुणीचे नाव असून ती शिक्षण घेत मॉडेलिंग करत होती. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय आहे.
घटनेच्या वेळी मुस्कान घरात एकटीच होती. याचाच गैरफायदा घेत हल्लेखाराने तिच्या पोटात आणि शरीराच्या इतर भागांवर चाकूने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या हत्येमागे इम्रान नावाच्या एका जिम ट्रेनरचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुस्कान आणि इम्रान गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.
नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रानला या परिसरात अनेकदा पाहिले गेले होते. तो मुस्कानचा पाठलाग करत होता, मात्र तिने त्याला नकार दिला असावा असा संशय आहे. या एकतर्फी प्रेमातूनच ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. "तरुणी घरात एकटी असताना तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून अधिक तपास सुरू आहे," अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मृत तरुणीच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स तपासत आहेत. संशयित आरोपी इम्रान काम करत असलेल्या जिमवर आणि त्याच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले असून, त्याच्या नातेवाईकांची व मित्रांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, तरुणीच्या पालकांना या जिम ट्रेनरसोबतच्या तिच्या ओळखीबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या हत्याकांडानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने घटनास्थळी आणि आसपासच्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मृत तरुणी आणि संशयित आरोपी वेगवेगळ्या धर्माचे आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झाले नसून आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथके रवाना झाली आहेत.