

Parvesh Verma Controversy : दिल्लीतील तिलक नगर विधानसभा मतदारसंघात रस्त्याच्या पाहणीदरम्यान दिल्लीचे मंत्री परवेश वर्मा यांनी एका तरुणाच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून विरोधी पक्ष असलेल्या 'आप'ने (AAP) सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला असून मंत्री वर्मा यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच मारहाण झालेल्या तरुणानेही मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.
दिल्लीचे मंत्री परवेश वर्मा तिलक नगर विधानसभा मतदारसंघात रस्त्याची पाहणी करत होते. यावेळी याचे चित्रीकरण एक तरुण आपल्या मोबाईलवर करत होता. तो तिलक नगरमधील 'आप'च्या आमदारासाठी सोशल मीडियाचे काम पाहतो. 'एएनआय' (ANI)शी बोलताना हा तरुण म्हणाला की, रस्ते पाहणीवेळी वर्मा आले असता यावेळी रस्त्याचा पृष्ठभाग कसा उखडून येत होता, हे मी त्यांना दाखवले. ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर मंत्र्यांना ते सहन झाले नाही; त्यांनी माझ्यावर हात उचलला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली... पोलीस तिथेच उपस्थित होते आणि हे सर्व त्यांच्याच देखरेखीखाली घडले," असे तो म्हणाला. "मंत्र्यांनी माफी मागितलीच पाहिजे आणि निलंबनासारखी काही शिस्तभंगाची कारवाई आवश्यक आहे, ती केली पाहिजे. आम्ही केवळ दावे करत नाही आहोत; प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध आहे. आम्ही एफआयआर दाखल केला आहे आणि पुढील कारवाईसाठी पाठपुरावा करू."
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्या अटकेची मागणी केली आणि रस्त्याची पाहणी करण्यासाठी सोमवारी त्या भागाला भेट देणार असल्याचे सांगितले. "मंत्र्याला अटक करा. मी उद्या तिथे जाईन," अशी पोस्ट त्यांनी 'एक्स' (X) वर केली. 'एक्स'वरील आणखी एका पोस्टमध्ये ते म्हणाले, "रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे मोदीजींच्या एका मंत्र्याने एका तरुणाच्या कानशिलात लगावली. मी उद्या तिलक नगरला जाऊन या रस्त्याची पाहणी करेन."
'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) 'एक्स'वर म्हटले आहे की, "मोदी सरकारला 'जेन झी' (Gen Z) पर्यंत पोहोचायचे आहे. तर, प्रत्यक्ष जमिनीवर हा संपर्क कसा असतो ते पहा - प्रश्न विचारल्याबद्दल दिल्लीचे कॅबिनेट मंत्री प्रवेश वर्मा 'जेन झी'मधील एका तरुणाच्या कानशिलात लगावत आहेत."
या घटनेवरून संताप व्यक्त होत असताना, मंत्र्यांनी त्यांच्या 'एक्स' (X) खात्यावर एक व्हिडिओ निवेदन शेअर केले. त्यासोबत त्यांनी लिहिले, "आजच्या घटनेमागचे संपूर्ण सत्य ऐका... पण जे घडले ते घडायला नको होते." ते म्हणाले की, विकास पुरी रिंग रोडवर गेल्या काही दिवसांपासून रस्ते बांधणीचे काम सुरू होते. त्या भागातील 'आप'चे आमदार जरनैल सिंग हे बऱ्याच काळापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अभियंत्यांकडे कंत्राटदारासोबत बैठक आयोजित करण्यासाठी आणि स्वतःसाठी 'कमिशन' मिळवून देण्यासाठी तगादा लावत होते. "आमच्या इंजिनिअरने पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आणि त्यांच्यावर एफआयआर (FIR) नोंदवला जात आहे," असे ते म्हणाले. "जर कोणी सरकारी कामात अडथळा आणला, सरकारी मालमत्तेचे नुकसान केले किंवा आमच्या अधिकाऱ्यांकडे कमिशनची मागणी केली - आणि जर आम आदमी पार्टीचा आमदार असे करत असेल - तर आम्ही ते खपवून घेणार नाही," असेही त्यांनी नमूद केले.