

दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) अंदमान समुद्रावरील हवामानात चक्रीय वाऱ्याचे क्षेत्र निर्माण होत असल्याचे (सायक्लोनिक सर्क्युलेशन) निरीक्षण नोंदवले आहे. १६ मे ते २२ मे दरम्यान हे क्षेत्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची अधिक शक्यता आहे.
पुढे बंगालच्या उपसागरात हे हवामान क्षेत्र विकसित होऊन २३ ते २८ मे दरम्यान 'चक्रीवादळ शक्ती'मध्ये रूपांतरित होऊ शकते, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. ज्याचा संभाव्य फटका भारतातील ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागांना, तसेच बांगलादेशमधील खुलना व चटग्राम या भागांना बसू शकतो.
दरम्यान, नैऋत्य मान्सूनने १३ मे २०२५ पासून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये प्रवेश केला आहे. एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल झाल्याने, मागील सात वर्षांतील हा सर्वात लवकर दाखल झालेला मान्सून आहे.
'चक्रीवादळ शक्ती'मुळे सखल भाग, किनारी भागांत पूर, वेगवान वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. बांगलादेश व भारतीय अधिकाऱ्यांनी आपत्तीची तयारी सुरू केली असून, उच्च धोक्याच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित निवाऱ्यांमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, लवकर चेतावणी देणारी यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आणि आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या शक्ती चक्रीवादळाचा ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशवर परिणाम होऊ शकतो. बंगालच्या किनारी भागातून ते पुढे जाऊन बांगलादेशातील खुलनाला धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या महिन्यात तीन कमी दाब प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे, त्यापैकी एक चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते. त्यामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकारने स्थानिक प्रशासनाला सतर्क आणि हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे.
IMD ने भारताच्या अनेक भागांमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन्समुळे जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या भागांत मे महिन्याच्या मध्यापर्यंत विजांसह हलका ते मध्यम पाऊस व झोंबणाऱ्या वाऱ्यांची शक्यता आहे. तसेच कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि छत्तीसगडसारख्या दक्षिण व मध्य भारतातील राज्यांमध्येही मान्सूनपूर्व पावसाची (पूर्वमान्सून पावसाची) शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
किनारी भागातील रहिवाशांना समुद्रात जाऊ नये आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे, म्हणून सर्वांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.