

-देशभरात 105 टक्के पावसाचा अंदाज (870 मी.मी)
-तामिळनाडू,पूर्वोेत्तर भारतात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज
-हवामान विभागाचा मान्सून 2025 चा पहिला अंदाज जाहीर
-दुसरा अंदाज 15 ते 20 मे दरम्यान जाहीर करणार
-अल,निनो,आयओडी,स्नोफॉल स्थिती मान्सूनसाठी अनुकूल
IMD Southwest Monsoon Prediction 2025
पुणे : महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची वार्ता भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी दिली आहे. यंदाचा मान्सून महाराष्ट्र अन छत्तीसगडवर मेहरबान राहणार असून जून ते सप्टेंबर या चार महिन्यात राज्यात अतिवृष्टी म्हणजे 105 ते 115 टक्के पाऊस बरसेल. तर देशभरात तो सामान्य पेक्षा जास्त म्हणजे 105 टक्के होईल अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ.आर.रविचंद्रन आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.
मंगळवारी दिल्ली मुख्यालयातून पॉवर पॉईंट्स सादरीकरणाद्वारे डॉ.रविचंद्रन आणि डॉ.महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की,तीन महत्वाच्या बाबी यंदाचा मान्सून चांगला बरसणार आहे हे सांगत आहेत. यात अल निनो, भारतीय समुद्री स्थिरांक आणि बर्फवृष्टी हे ते तीन निर्देशांक आहेत ज्या आधारे हा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. संपूर्ण देशात यंदाचा मान्सून जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालवाधीत समान्यपेक्षा जास्त म्हणजे 105 टक्के( सरासरी 870 मिलीमीटर) राहील.यात 1971 ते 2020 या 49 वर्षातील मान्सूनच्या डेटाद्वारे शास्त्रज्ञांनी कपल्ड मॉडेलचा अभ्यास करुन हा अंदाज दिला आहे.
डॉ.महापात्रा यांनी मान्सून कोणत्या राज्यात किती आणि कसा पडेल याचा अंदाज एका नकाशाद्वारे दिला. यात त्यांनी सांगितले की,देशभर मान्सून सामान्य पेक्षा जास्त म्हणजे सुमारे 105 टक्के पडेल. तर महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यात मुसळधार (अबोव्ह नॉरमल) म्हणजे सुमारे 105 ते 115 टक्के इतका जास्त पडेल. त्यातही मराठवाड्यात यंदा त्याहीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण नकाशात देशभरात निळा रंग दाखवलेला आहे. तर महाराष्ट्र आणि छत्तीसगड ही दोन राज्ये गडद निळ्या रंगात दाखवली आहेत.
डॉ.महापात्रा यांनी सांगितले की, महाराष्ट्र,छत्तीसगड,आंध्र प्रदेश ही तीन राज्ये गडद निळ्या रंगात दाखवली आहेत. त्यामुळे तेथे सामान्य पेक्षा जास्त पाऊस राहिलच पण मराठवाडा हा भाग अतिगडद निळा दाखवला आहे. म्हणजे तेथे अतिवृष्टीची शक्यता आहे. तेथे 115 मी.मी पेक्षाही जास्त पावसाचा अंदाज आहे.
डॉ.महापात्रा म्हणाले, अल निनो,भारतीय समुद्री स्थिरांक (आयओडी) आणि हिमालयातील बर्फवृष्टी (स्नोफॉल) हे तीन महत्वाचे घटक मान्सूनसाठी जबाबदार असतात.यंदा अल निनो,आयडओडी हे जून ते सप्टेंबर पर्यंत तठस्थ राहणार आहेत.तर हिमालयात यंदा बर्फवृष्टी साधारण होती.ती बाबही चांगल्या मान्सूनसाठी सकारात्मक असते.बर्फवृष्टी जास्त झाली तर मान्सून कमजोर,कमी झाली तर चांगला मान्सून चांगला असे संकेत हवामानाच्या भाषेत मानले जातात.