

Crime News Wife Kills Husband
महराजगंज: होळीच्या उत्साहात उत्तर प्रदेशातील महराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बासपार कोठी टोला पिपरा येथे किरकोळ वादातून एका ६० वर्षीय महिलेने आपल्या ६२ वर्षीय पतीवर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळल्याचा आरोप आहे. या घटनेत पतीचा जागीच मृत्यू झाला असून, पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
सुमित्रा (६०) ही ४० वर्षांपूर्वी आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईला गेली होती. तिथे तिची भेट रामपत (६२) याच्याशी झाली. दोघांनी लग्न केले. सुमारे १० वर्षे मुंबईत राहिल्यानंतर हे दाम्पत्य आपल्या मुलीसह गावी परतले. ग्रामपंचायतीने त्यांना राहण्यासाठी घरही उपलब्ध करून दिले होते. काही काळानंतर हे कुटुंब पुन्हा मुंबईला गेले, मात्र सात वर्षांपूर्वी ते पुन्हा गावी परतले होते.
स्थानिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघांनाही दारूचे व्यसन होते. मंगळवारी सायंकाळी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादानंतर पती रामपत हा खोलीत खाटेवर झोपायला गेला. मध्यरात्रीच्या सुमारास संधी साधून सुमित्राने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली. यानंतर बाहेरून दरवाजा कडी लावून बंद केला. रामपत मदतीसाठी ओरडत होता, मात्र त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचू शकला नाही आणि होरपळून त्याचा अंत झाला.
मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात खळबळ उडाली. गावकऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा रामपतचा मृतदेह कोपऱ्यात बसलेल्या स्थितीत जळालेला आढळला. गावातील चौकीदाराने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच आरोपी सुमित्राने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तिला पाठलाग करून पकडले.
फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून माचिस आणि पेट्रोलचा वास येणारी बादली जप्त केली आहे. पत्नी सुमित्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.