

Bihar Crime News
दरभंगा: रुग्णालयाच्या परिसरातच एका नवजात बालकाचा मृतदेह उघड्यावर नाल्यात पडला होता, भटकी कुत्री या मृतदेहाचे लचके तोडत होते. बिहारमधील दरभंगा येथील 'दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल' परिसरातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयाच्या न्यू सर्जिकल इमारतीसमोरील नाल्याजवळ भटक्या कुत्र्यांची टोळी जमली होती. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, एका नवजात बालकाचा मृतदेह तिथे पडलेला दिसला आणि कुत्री त्याचे लचके तोडत होती. हे भीषण दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यात पाणी आले.
घटनेची माहिती मिळताच बेंता पोलीस स्टेशनचे पथक आणि रुग्णालय प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मृत नवजात बालकाला वैद्यकीय कचऱ्यासोबतच उघड्यावर फेकले असावे आणि तिथूनच कुत्र्यांनी तो मृतदेह ओढत नाल्यापर्यंत आणला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. DMCH च्या परिसरात अनेक खासगी नर्सिंग होम्स आणि क्लिनिक्स आहेत. यापूर्वीही अनेकदा उघड्यावर वैद्यकीय कचरा फेकल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.
या प्रकरणावर बोलताना DMCH चे उपाधीक्षक डॉ. सुरेंद्र कुमार यांनी सांगितले की, "घटनेची माहिती मिळताच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाईल, जेणेकरून हा मृतदेह नेमका कोणी टाकला याचा शोध लागेल."