Nanded crime news | गुप्तधनाच्या आमिषाने मध्यरात्री शेतात खड्डा ; गडगा येथे सहा जणांना पोलिसांचा दणका

Nanded crime news
Nanded crime news
Published on
Updated on

नायगाव : नायगाव तालुक्यातील गडगा येथे गुप्तधन मिळवण्याच्या आमिषाने अंधश्रद्धेचा आधार घेत मध्यरात्री शेतात खड्डा खोदणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी रंगेहात पकडत अटक केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अंधश्रद्धेविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.४० ते १२.४० दरम्यान नरसी–गडगा रोडवरील पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या महादेव मंदिरासमोरील निळकंठ उर्फ बाळू देवणे यांच्या शेतात काही इसम पूजा करून गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदत असल्याची गोपनीय माहिती नायगाव पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड व पोलीस कर्मचारी संजय चेरकूलवार यांना पथकासह घटनास्थळी पाठविले. पथकाने तातडीने छापा टाकला असता आरोपी पूजा साहित्य मांडून सुमारे दोन फूट खोल खड्डा खोदताना आढळून आले.

घटनास्थळावरून पूजेचे साहित्य, फावडा, २० लिटरचा प्लास्टिक कॅन, पांढरे कापड तसेच TS-07-HB-7687 क्रमांकाची मारुती सुझुकी एर्टिगा चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मालमत्तेची एकूण किंमत अंदाजे ६ लाख १७० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ००४९/२०२६ नोंदवून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, 2013 च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

परमेश्वर देवदास चांदकर, व्यंकट माधवराव हूसे (रा. वळंकी ता. मुखेड), दिलीप भानुदास डोईवाड (रा. कोपरा ता. नायगाव), माधव रामराव सूर्यवंशी, विशाल बालाजी शिंदे व लक्ष्मीबाई रामराव सूर्यवंशी, अशी आरोपींची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत काही आरोपी तेलंगणा राज्यातील बिजूर भैसा, आदिलाबाद परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले असून सविस्तर पत्ते एफआयआरमध्ये नमूद आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती -चे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा, २०१३ नुसार या कायद्यातील गुन्ह्यांचा तपास ‘अ’ दर्जाच्या (राजपत्रित) पोलिस अधिकाऱ्याकडे देणे बंधनकारक आहे. त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास तात्काळ पात्र अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात यावा. अंधश्रद्धेच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक आहे.”

अफवांवर विश्वास ठेवू नका – शाम पानेगावकर “गुप्तधन आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. अशा प्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नाही. पोलिसांची कारवाई यापुढेही सुरूच राहील. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी,” — शाम पानेगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी या घटनेमुळे गडगा परिसरात चर्चेला उधाण आले असून अंधश्रद्धेविरोधात कठोर संदेश गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news