

ghaziabad crime news
गाझियाबादमधील मोदीनगरमध्ये एका तरुणाचा मृत्यू हा घातपात आहे की त्याने जीवन संपवले? यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. पोलीस आणि कुटुंबीयांचे दावे परस्परविरोधी असून, मृताच्या मोबाइलमधील 'सर्च हिस्ट्री'ने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढवले आहे. मधुर यादव (वय २५) याने जीवन संपवले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असला, तरी कुटुंबीयांनी मात्र त्याची पेट्रोल टाकून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मंगलविहार कॉलनीतील रहिवासी जितेंद्र यादव यांचा मुलगा मधुर यादव याची राजस्थान उच्च न्यायालयात 'स्टेनो' पदावर निवड झाली होती. येत्या आठवडाभरात तो रुजू होणार होता. शनिवारी रात्री सातच्या सुमारास मधुर 'गोविंदपुरीला जातो' असे सांगून घरातून बाहेर पडला. रात्री नऊच्या सुमारास कुटुंबीयांनी त्याला फोन केला असता 'लवकरच घरी येतो' असे त्याने सांगितले, मात्र थोड्याच वेळात त्याचा फोन बंद झाला.
निवाडी रोडवरील फायर स्टेशनच्या मागील बाजूस पेटलेल्या अवस्थेत मधुर रस्त्याच्या दिशेने धावत आला. स्थानिक नागरिकांनी आग विझवून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांच्या दाव्यानुसार, मृत्यूआधी मधुरने सांगितले की, "अभिषेक नावाच्या मुलाने आधी डोळ्यांत मिरचीची पूड टाकली आणि नंतर पेट्रोल ओतून पेटवून दिले." गंभीर अवस्थेत त्याला दिल्लीला हलवण्यात आले, मात्र रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मधुरच्या मोबाईलची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.गेल्या १५ दिवसांपासून तो सोशल मीडियावर ' जीवन कसे संपवावे' याचे उपाय शोधत होता. जीवन कसे संपवावे, यासंदर्भातील सुमारे २५ व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये आढळले. त्याने याच संदर्भात 'कमी वेदनेत कसे मरावे? यापासून जीवन संपवण्याबाबतचे अनेक व्हिडिओ सर्चकेल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणाला प्रेमप्रकरणाचीही किनार असल्याचे बोलले जात आहे. मधुरच्या मोबाईलमध्ये एका तरुणीसोबतचे चॅट्स सापडले असून, तो तिच्याशी लग्नाबाबत चर्चा करत होता. मात्र, कुटुंबीयांचा या विवाहाला विरोध असल्याची चर्चा आहे. मधुर यादवच्या मोबाईलमध्ये अनेक संशयास्पद व्हिडिओ सापडले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.