

Crime News
लखनऊ: पतीने मस्करीत उच्चारलेला एक शब्द एका तरुण मॉडेलच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडली आहे. पतीने माकड म्हटलं म्हणून मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवले. एका छोट्याशा थट्टेचा असा भयंकर शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सहादतगंज येथील लकडमंडी परिसरात राहणारी २३ वर्षीय तनु सिंह मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेत होती. गुरूवारी तनु, तिचा पती राहुल श्रीवास्तव, तिची मोठी बहीण आणि भाचा असे सर्वजण गप्पा मारत बसले होते. यादरम्यान राहुलने तनुला गमतीने 'माकड' म्हटले. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करू पाहणारी तनु स्वतःच्या सौंदर्याबाबत अत्यंत संवेदनशील होती. पतीचा हा टोमणा तिच्या जिव्हारी लागला आणि ती रागाने दुसऱ्या खोलीत निघून गेली.
तनु नेहमीप्रमाणे रागावली असावी, असे समजून पती राहुल घराबाहेर जेवण आणण्यासाठी गेला. अर्ध्या तासानंतर तो परतला असता तनुने दरवाजा उघडला नाही. संशय आल्याने राहुलने खिडकीतून पाहिले असता त्याला तनु फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसली. कुटुंबीयांनी तातडीने दरवाजा तोडून तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तनु आणि राहुल यांचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. राहुल हा रिक्षाचालक आहे. दोघांमध्ये सुखाचा संसार सुरू होता, मात्र किरकोळ वादातून तनुने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.