

love marriage murder case
बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका नऊ वर्षांच्या प्रेमसंबंधांचा दुर्दैवी आणि धक्कादायक अंत झाला आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच जितेंद्र कुमार यादव (वय ३३) याचा संशयास्पद मृत्यू झाला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे भासवण्यात आले, मात्र शवविच्छेदन अहवालातून हत्येचा खुलासा झाला असून पत्नीनेच आपल्या माहेरच्यांच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
जितेंद्र कुमार यादव आणि ज्योती यांचे गेल्या नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विद्यार्थी दशेपासून सुरू झालेल्या या प्रेमाचे रूपांतर २५ नोव्हेंबर रोजी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाहात झाले. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात पैशांवरून वाद सुरू झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रने ज्योतीच्या बँक खात्यातून २०,००० रुपये काढून ते ऑनलाइन जुगारात गमावले होते. याच कारणावरून २६ जानेवारी रोजी त्यांच्यात जोरदार भांडण झाले.
रागाच्या भरात ज्योतीने तिचे वडील कालीचरण, आई चमेली आणि भाऊ दीपक यांना बोलावून घेतले. इज्जतनगर भागातील भाड्याच्या घरात हा वाद विकोपाला गेला. यावेळी ज्योतीच्या आई-वडिलांनी आणि भावाने जितेंद्रचे हात-पाय दाबून धरले आणि ज्योतीने त्याचा गळा आवळून खून केला, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
हत्या केल्यानंतर हा प्रकार आत्महत्या वाटावा यासाठी आरोपींनी जितेंद्रचा मृतदेह मफलरच्या साहाय्याने खिडकीच्या ग्रीलला लटकवला. त्यानंतर परिसरात 'जावयाने गळफास घेतला' असा आरडाओरडा केला. सुरुवातीला पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली होती, मात्र जितेंद्रचा भाऊ अजय कुमार याने संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली.शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण 'गळा आवळणे' (Strangulation) असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे आत्महत्येचा बनाव फसला. पोलिसांनी तत्काळ कलम बदलून हत्येचा गुन्हा दाखल केला.
पोलिस चौकशीत ज्योतीने आपला गुन्हा मान्य केला आहे. तिने सांगितले की, जितेंद्र 'इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट' मध्ये कंत्राटी कर्मचारी होता, तर ती स्वतः परिवहन महामंडळात कंत्राटी वाहक म्हणून काम करत होती. पैशांच्या वादातून झालेल्या भांडणात संतापाच्या भरात तिने हे पाऊल उचलल्याचे कबूल केले. पोलिसांनी पत्नी ज्योती, तिचे वडील आणि आई यांना अटक केली असून, फरार असलेला भाऊ दीपक याचा शोध सुरू आहे.