

Covid 19 cases India
देशात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढले आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. देशात २७ मे रोजी एकूण कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १,०१० वर पोहोचली. कोरोनाची लक्षणे सौम्य स्वरुपाची असून लोकांनी घाबरून जाऊ नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पण राज्यांनी लोकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 वर जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) लक्ष ठेवले जात आहे. याबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मुख्यत: केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील रुग्णसंख्या ४०० पार झाल्याने चिंता व्यक्क केली जात आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही रुग्णसंख्येत वाढ दिसून आली आहे. दरम्यान, तेलंगणात आज पहिला रुग्ण आढळून आला.
केंद्रीय आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सर्व राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्येत केरळमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. येथे ३३५ रुग्ण वाढले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात १५३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिल्लीत ९९ अतिरिक्त रुग्णांची भर पडली आहे. दिल्ली-एनसीआरमधील एकूण रुग्णसंख्येने १०० चा आकडा ओलांडला आहे. तर गुजरातमध्ये नव्या ७६ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे येथील एकूण रुग्णसंख्या ८३ झाली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर परिस्थिती हाताळण्यासाठी रुग्णालयांची यंत्रणा पूर्णपणे तयार ठेवण्यात आली आहे.
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. कोरोनाच्या नव्या हेरिएंटवर विद्यमान लसीची संक्रामकता आणि परिणामकारकता यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
देशात मार्च २०२० पासून कोरोनाची सुरुवात झाली. या महामारीदरम्यान, देशातील लोकांनी कोविड-१९ च्या दोन लाटा अनुभवल्या. केरळ सुमारे ३० रुग्ण नोंद झालेले पहिले राज्य होते. दोन वर्षांहून अधिक काळ कोरोना राहिला. या महामारीने देशातील ५ लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने सर्व उद्योगांना त्याचा मोठा फटका बसला. कोरोना काळात अनेक व्यवसाय बंद पडल्याने हा काळ खरोखरच सर्वांसाठी आव्हानात्मक होता.
इंडियन सार्स-CoV-2 जिनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, COVID-19 चा सध्याचा स्ट्रेन हा व्हेरिएंट JN.1 विषाणूचे प्रोटीन म्युटेशन्स आहे. प्राथमिक संशोधनातून असे दिसून आले आहे की NB.1.8.1 व्हेरिएंट मागील स्ट्रेन्सपेक्षा अधिक संक्रमित असू शकतो. आजपर्यंत, २२ वेगवेगळ्या देशांमधून NB.1.8.1 चे ५८ जिनोम सिक्वेन्सेस जागतिक COVID-19 डेटाबेसकडे पाठवण्यात आले आहेत. NF.7 व्हेरिएंटचा प्रसार मुख्यतः भारताच्या दक्षिण भागात दिसून आला. NB.1.8.1 आणि NF.7 हे दोन्ही व्हेरिएंट मोठ्या शहरांत आढळून आले आहेत. दरम्यान, अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय रुग्णांमध्येही उच्च संसर्गक्षमता नोंदवण्यात आली आहे.
२०२५ मध्ये भारतात कोरोनाची सध्याची लक्षणे सौम्य आणि हलक्या स्वरुपाची असल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने प्रसिद्ध केलेल्या अलीकडील रिपोर्ट्सनुसार, NB.1.8.1 व्हेरिएंटमुळे जागतिक पातळीवर कमी धोका आहे. सध्याच्या कोरोनामुळे घसा खवखवणे, थकवा, सौम्य स्वरुपाचा खोकला, ताप, स्नायूदुखी, नाक चोंदणे, कमी स्वरुपाचा हायपरथर्मिया, डोकेदुखी, मळमळ आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आदी लक्षणे समोर आली आहेत.
जर ही लक्षणे ३ ते ४ दिवसांपेक्षा अधिक दिवस राहिली तर आरोग्य तज्ज्ञांनी रॅपिड अँटीजेन होम टेस्ट अथवा RT-PCR करण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत अधिक खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि केरळमध्ये ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.