

COVID death in Kalyan
डोंबिवली : पावसाच्या आगमनामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढण्याची शक्यता असतानाच विसर पडलेली कोरोना महामारी पुन्हा एकदा परतल्याचे स्पष्ट झाले आहे आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना ठाण्यापाठोपाठ आता कल्याणमध्ये एका महिलेचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. तथापी कोरोना सर्वत्र पसरू नये, यासाठी केडीएमसीसह शासनाच्या आरोग्य यंत्रणेकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी कळवा परिसरात एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. कल्याण+डोंबिवलीमध्ये मागील आठवड्यात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या चार पैकी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. इतर दोन कोरोनाबाधित रुग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एका रूग्णावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर एका रूग्णावर उपचार करून त्याला सोडण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या एका महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी वजा चाचणीतून या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. या महिलेचा रिपोर्ट घेतल्यानंतर त्याच रात्री मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाबाधित एकूण ४ रूग्ण आहेत. त्यापैकी एका महिलेला उपचार देऊन सोडण्यात आले आहे. सगळ्यांनी काळजी घ्यावी. कल्याणच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात स्वतंत्र वॉर्ड असून तेथे कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
मास्कचा वापर करावा, हात नेहमी स्वच्छ ठेवावे. वृद्ध व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, जर कोणतीही कोरोनाची लक्षणे वाटल्यास तात्काळ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुल्क यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.