

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये जादूटोणा केल्याच्या संशयातून एका कुटुंबातील चौघांवर चाकूने हल्ला करून गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला असून कुटुंबातील दोघे गंभीर जखमी आहेत.
ही घटना सोमवारी (दि.२२) सिवान जिल्ह्यातील जामो पोलिस स्टेशन परिसरातील हेतीमपूर कुर्मी टोला गावात घडली. अवध किशोर साह (वय ५०) आणि त्यांची पत्नी रीता देवी अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत अवध साह यांची आई व मुलगी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, अवध साह आणि छोटे लाल साह हे दोघे रक्ताच्या नात्यातील असून त्यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. अवध किशोर साह हे आपल्या कुटुंबासह हेतिमपूर येथे वास्तव्यास असून छोटे लाल साह हा आपल्या कुटुंबासह सारणमधील मशरक येथे राहतो. काही दिवसांपूर्वी जादूटोणा केल्याच्या संशयातून त्यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला होता.
अवध किशोर साह हे सोमवारी हेतीमपूर येथील आपल्या घराजवळील एका झाडाखाली बसले होते. यावेळी छोटे लाल साहचे कुटुंब तेथे आले. यादरम्यान त्यांच्यात जादूटोणा केल्याच्या संशयातून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी छोटे लाल साह यांच्या कुटुंबातील सदस्यांनी चौघांवर चाकूने हल्ला करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात किशोर साह व रीता देवी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची आई व मुलगी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.