

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील पूर्णिया येथे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांनी क्रूरतेचा कळस गाठत एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळून त्यांची निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.६) रात्री ३ वाजता मुफस्सिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रानीपतारा तेटगामा या गावात घडली. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर पाचही जणांचे मृतदेह हल्लेखोरांनी गायब केले.
हत्या झालेल्या कुटुंबातील महिलेवर चेटकीन असल्याचा संशय या हल्लेखोरांनी व्यक्त केला होता. या संशयाच्या आधारे या महिलेसह कुटुंबातील पाच जणांना घेरून काही लोकांच्या जमावाने मारहाण केली. त्यांनंतर त्यांना जिवंत जाळून पाच निष्पाप लोकांचे जीव घेतले. त्यानंतर त्यांचे अर्धवट जळालेले मृतदेह पोत्यात भरून ते एका तलावात फेकून दिले. या धक्कादायक घटनेमुळे बिहारमधील पूर्णिया जिल्हा हादरून गेला आहे.
एका वृतानुसार, गावात काही महिन्यांपूर्वी चार-पाच मुलांचा मृत्यू झाला होता. यावरून गावातील काही निर्दयी लोक 'तुझ्यामुळेच त्या मुलांचा मृत्यू झाला' असा आरोप करत सीतादेवी हिला चेटकीन म्हणून त्रास देत होते. रविवारी रात्री या कारणातून सीतादेवीचा गावातील काही लोकांशी वाद झाला. या वादाचा राग मनात धरून त्या निर्दयी लोकांसह काही लोकांचा जमाव रविवारी रात्री ३ वाजता सीतादेवी हिच्या घराजवळ आला. त्यानंतर त्यांनी सीतादेवीसह कुटुंबातील पाच जणांना घरातून ओढत एका तलावाजवळ आणले. त्यांना अमानुषरित्या मारहाण करत अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले. या दुर्दैवी घटनेतून कुटुंबातील १६ वर्षाचा सोनू कुमार हा मुलगा सुदैवाने वाचला. त्याने पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची आपभीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मुलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी चार आरोपींची नावे उघड झाली असून त्यापैकी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत गावातील अनेक लोकांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.