नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : वरिष्ठ न्यायालयांमधील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांसाठीच्या कॉलिजियम प्रणालीवर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. रिजिजू यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करताना दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. एस. सोढी यांच्या मुलाखतीची क्लीप शेअर केली आहे. 'सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींच्या नियुक्तीचा निर्णय स्वतःकडे ठेवत घटनेला हायजॅक केले आहे, अशी टिप्पणी त्या क्लीपमध्ये सोढी यांनी यांनी केल्याचे दिसून येत आहे.
न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांसाठीच्या कॉलिजियम प्रणालीवरुन केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय मागील काही काळापासून एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. अलिकडेच कायदा मंत्री रिजिजू यांनी कॉलिजियममध्ये सरकारचा प्रतिनिधी नेमला जावा, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आता त्यांनी माजी न्यायमूर्ती सोढी यांच्या मुलाखतीची क्लीप शेअर करीत कॉलिजियम प्रणालीवर टीका केली आहे. सोढी यांच्या विचारांचे लोकांनी समर्थन करावे, असे आवाहनही रिजिजू यांनी केले आहे.
कायदे बनविण्याचा अधिकार संसदेकडे आहे. सर्वोच्च न्यायालय कायदे बनवू शकत नाही, कारण त्याच्याकडे तसा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालय कायद्यात सुधारणा करु शकते. तथापि न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या मुद्दयावर सर्वोच्च न्यायालयाने घटनेलाच हायजॅक केल्याचे दिसून येत आहे, असे मत माजी न्यायमूर्ती सोढी यांनी एका मुलाखतीत मांडले होते.
हेही वाचलंत का ?