नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा युक्रेन मध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला कथीतरीत्या गोळी लागल्यामुळे तो जखमी झाल्याच्या मुद्यावरून काँग्रेसने आज (शुक्रवार) सरकारवर निशाना साधला. काँग्रेसने आरोप करत म्हटले आहे की, युक्रेन मध्ये भारतीय विद्यार्थी संकटात आहेत, मात्र केंद्रातील मोदी सरकार पीआर एजन्सी बनली आहे.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, "आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली. युक्रेन-रशिया युद्धात प्रत्येक क्षणी मुलांना धोका आहे. पण मोदी सरकार केवळ जनसंपर्क संस्था राहिली आहे. त्यांनी प्रश्न विचारलाय की, "युक्रेनमधील मोठ्या हल्ल्यांमुळे बाहेर पडू न शकलेल्या हजारो मुलांना कधी बाहेर काढले जाणार आहे?" चार मंत्र्यांना फक्त टाळ्या वाजवण्यासाठी पाठवले आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
सुरजेवाला यांनी नागरी उड्डाण राज्यमंत्री व्हीके सिंग यांनी केलेल्या विधानावर हल्लाबोल केला आहे. 9 दिवसांपासून बॉम्ब/क्षेपणास्त्र हल्ल्यात अडकलेल्या मुलांना मोदी सरकारचे मंत्री सांगत आहेत की, जर अल्टिमेटम होता, तर आधी बाहेर का पडला नाही, थोडा मोठा रस्ता पार करून तुम्ही या.. जेव्हा तुम्ही सर्व धोक्यांमधून बाहेर पडाल, तेव्हा आम्ही तुमचे स्वागत करू…. हे देशाचे मंत्री आहेत की, ट्रॅव्हल एजंट?
व्हीके सिंग यांनी आज सांगितले की, युक्रेनची राजधानी कीवमध्ये झालेल्या गोळीबारात कथीत एक भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सिंह सध्या शेजारच्या पोलंडमध्ये आहेत. मंत्री पत्रकारांना म्हणाले, "आज आम्हाला कळले की, कीव सोडणाऱ्या एका विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. त्याला पुन्हा कीव येथे नेण्यात आले आहे. युद्धात असे घडते."