

Nainital Clash
नैनिताल : उत्तराखंडमधील नैनितालमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जातीय तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने दुकाने, हॉटेल्सची तोडफोड करत तीन तास धुडगूस घातला. यामुळे येथील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
येथे बुधवारी रात्री एका अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने ६५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने दुकानांची तोडफोड केली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
१२ एप्रिल रोजी संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून त्याच्या कारमध्ये नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १२ एप्रिल रोजी कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या ६५ वर्षीय उस्मानवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
पीडितेच्या आईने बुधवारी रात्री मुलीला पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले. तसेच संशयित आरोपीला अटक करण्यात आली.
यानंतर बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास संशयित आरोपींचे कार्यालय ज्या ठिकाणी आहे तेथील बाजारपेठेजवळ जमाव एकत्र आला. त्यानंतर संतप्त जमावाने पुढे चाल करत अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानांची आणि हॉटेल्सची तोडफोड केली. एका व्हिडिओत, एक व्यक्ती दुकानांतील कर्मचाऱ्यांना कानशिलात मारताना दिसून आला. जमावाने मशिदीसमोर आणि पोलिस ठाण्यासमोरही निदर्शने केली. यामुळे तणाव निर्माण झाला, असे पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रल्हाद मीणा यांनी सांगितले की या प्रकरणी तपास सुरू आहे. भविष्यात कोणीही असे लज्जास्पद कृत्य करू नये म्हणून आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. नैनितालमधील सर्व रहिवाशांनी आणि पर्यटकांनी शांतता, जातीय सलोखा राखावी, असे आवाहन त्यांनी केले.
नैनितालमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक (शहर) जगदीश चंद्र म्हणाले की, मशिदीत, दोन्ही समाजाची लोकसंख्या असलेल्या ठिकाणी आणि बाजारपेठेत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेनंतर नैनितालमध्ये आलेले पर्यटक त्यांच्या खोल्यांमध्ये अडकून पडले आहेत. हॉटेल बंद असल्याने त्यांना जेवण आणि पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. येथील तल्लीताल व्यापर मंडळाने पर्यटकांसाठी लंगरची व्यवस्था केली आहे.