मंचर: मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयाजवळ टपरी चालवणारा दिव्यांग तरुण गणेश रवींद्र सोनवणे (वय 28, रा. शितकलवस्ती, मंचर) यांच्या खूनप्रकरणी मंचर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत दोन जणांना मंगळवारी (दि. 29) रात्री अटक केली. सिद्धेश संतोष रेनके (वय 19, रा. जुना बैलबाजार, बाणखेलेमळा, मंचर) व विघ्नेश अशोक शेवाळे (वय 20, रा. लांडेवाडी, ता. आंबेगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
दिव्यांग तरुण गणेश सोनवणे याचा येथील महात्मा गांधी विद्यालयाजवळ खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती. याची माहिती कळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला होता. (Latest Crime News)
याप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गंभीर गुन्हा असल्याने मंचरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंचरचे पोलिस उपनिरीक्षक सनिल धनवे व टीम यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सहा तासांच्या आत सिद्धेश रेनके व विघ्नेश शेवाळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
या दोघांनी गुन्हा कबूल केला असून गणेश, सिद्धेश व विघ्नेश हे तिघे मित्र असून, सोमवारी (दि. 28) रात्री ते टपरीशेजारील असलेल्या जुन्या महिंद्रा गाडीत बसले होते. या वेळी त्यांच्यात चेष्टा-मस्करी सुरू असताना वाद निर्माण झाला.
वादाचे रूपांतर भांडणात होऊन घटनास्थळी असलेल्या बियरच्या बाटलीने गणेश सोनवणे याच्यावर वार करण्यात आले. पोटात व मानेवर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि यामध्ये गणेशचा जागीच मृत्यू झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.
दरम्यान, दोन्ही आरोपींना मंचर पोलिसांनी अटक केली असून, घोडेगाव न्यायालयात बुधवारी (दि. 30) दुपारी हजर केले असता शनिवार (दि. 3 मे) पर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश देण्यात आला.