

Indian tech entrepreneur ends his life after shooting wife and son dead in US
वॉशिंग्टन : तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय उद्योजकाने अमेरिकेतील आपल्या घरी पत्नी आणि मुलावर गोळीबार करून त्यांचा खून केला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. वॉशिंग्टन राज्यातील न्यूकॅसल शहरात 24 एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षवर्धन एस. किक्केरी (वय 57) असे या उद्योजकाचे नाव असून मृतांमध्ये त्याच्यासह त्याची पत्नी श्वेता पन्यंम (वय 44) आणि त्यांचा 14 वर्षांच्या मुलग्याचाही समावेश आहे. या दांपत्याचा दुसरा मुलगा घटनेवेळी घरी नसल्यामुळे तो बचावला आहे.
घटनास्थळी असलेल्या वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका मुलाला घराबाहेर आणून त्याचे सांत्वन केले. मात्र, किंग काउंटी शेरिफ कार्यालयाने अद्याप मुलाची अधिकृत ओळख जाहीर केलेली नाही.
किक्केरी यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब मैत्रीपूर्ण पण थोडेसे अंतर्मुख राहणारे होते. किक्केरी यांनी कशामुळे एवढ्या टोकाचे पाऊल उचलले हे स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
हर्षवर्धन किक्केरी हे कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील के. आर. पेट तालुक्याचे रहिवासी होते. त्यांनी 'होलोवर्ल्ड' नावाची रोबोटिक्स कंपनी स्थापन केली होती, ज्याचे मुख्यालय मुळात म्हैसूर येथे होते. त्यांची पत्नी श्वेता या कंपनीच्या सह-संस्थापक होत्या.
2017 मध्ये ते दोघे भारतात परतले आणि 'होलोवर्ल्ड' ची स्थापना केली. मात्र कोविड-19 महामारीमुळे ही कंपनी 2022 मध्ये बंद पडली आणि त्यानंतर हर्षवर्धन पुन्हा अमेरिकेत गेले.
किक्केरी हे त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध होते. सुप्रसिद्ध आंत्रप्रुनर अशी त्यांची ओळख बनली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांची भेट झाली होती. त्यावेळी सीमेवर सुरक्षेसाठी रोबोट्सचा वापर करण्याविषयी उभयंतात चर्चा झाल्याचे समजते.
रोबोटिक्स क्षेत्रात किक्केरी यांचा हातखंडा होता. त्यांनी अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट कंपनीतही काम केले होते.