

Abhijeet Dipke Protest: नीट पेपर लीक प्रकरणा विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके शनिवारी सकाळी अमेरिकेतील बोस्टनहून दिल्लीत दाखल झाले. दिल्ली विमानतळावर उतरताच त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला आणि त्यांनी ‘जय भीम’चा नारा दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दिल्लीत पोहोचल्यानंतर दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. "शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले आहे," असे ते म्हणाले.
यापूर्वी अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत आपल्या समर्थकांना जंतर-मंतर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. "पुस्तक आणि तिरंगा घेऊन या. पोलिसांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून फुले द्या. हे आंदोलन प्रेम, शांतता आणि संविधानिक मार्गाने पुढे नेऊया," असे आवाहन त्यांनी केले होते.
दरम्यान, जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. यापूर्वी या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिल्याने आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला.
कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपर लीक प्रकरण, सीबीएसई निकालातील कथित त्रुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दीपके यांच्या आवाहनाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक समर्थक जंतर-मंतरकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. संसद मार्ग परिसरासह संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानांबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका यापूर्वी जाहीर केली होती. त्यामुळे या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.