

Abhijeet Dipke Protest: नीट पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करणारे कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके शनिवारी सकाळी अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाले. जंतर-मंतर येथे होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते राजधानीत पोहोचले असून, आगमनानंतर त्यांनी समर्थकांना शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना विशेष संदेश दिला. "मी दिल्लीत पोहोचलो आहे. जंतर-मंतरवर तुम्हा सर्वांना भेटण्याची उत्सुकता आहे. पुस्तक आणि आपला तिरंगा सोबत आणायला विसरू नका. तसेच सहानुभूती आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून पोलिस कर्मचाऱ्यांना फुले द्या. हे आंदोलन प्रेम आणि शांततेच्या मार्गाने पुढे न्यायचे आहे," असे त्यांनी म्हटले.
कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी जंतर-मंतर येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतील बोस्टनहून भारतात परत येत शांततापूर्ण जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली होती.
या आंदोलनाला काही सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळण्याचीही चर्चा आहे. शिक्षण सुधारणा आणि पर्यावरण विषयांवर काम करणारे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी यापूर्वी असे संकेत दिले होते की, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर तेही या आंदोलनात सहभागी होऊ शकतात.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जंतर-मंतरवरील आंदोलनासाठी अद्याप अधिकृत परवानगी अर्ज प्राप्त झालेला नाही. मात्र, मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घेण्यात आली आहे.
नवी दिल्ली परिसरात एक हजाराहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना आंदोलकांशी कोणताही संघर्ष टाळून संवादाच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने मध्य दिल्लीचे 12 झोनमध्ये विभाजन करण्यात आले असून प्रत्येक झोनची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानांबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनामुळे राजधानीतील वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.