

CNG price hike
नवी दिल्ली: पश्चिम आशियातील सतत वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एलएनजी वायूच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रात सीएनजीच्या किरकोळ दरात प्रतिकिलो ३.८९ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. हे नवीन दर आज सकाळी ६ वाजेपासून लागू झाले आहेत.
नवीन दर काय आहेत?
या वाढीनंतर दिल्लीत सीएनजीचा दर प्रतिकिलो ८३.०९ रुपयांवरून ८६.९८ रुपये झाला आहे. तर इतर शहरांमधील नवे दर खालीलप्रमाणे आहेत:
दिल्ली: ₹८६.९८ प्रतिकिलो
गुरुग्राम: ₹९२.०१ प्रतिकिलो
नोएडा: ₹१११.८७ प्रतिकिलो
गाझियाबाद: ₹९५.५९ प्रतिकिलो
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, जुलै महिन्यापासून पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढल्यामुळे 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'तून होणाऱ्या एलएनजी जहाजांच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. परिणामी, जागतिक बाजारात एलएनजीचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. आयजीएलने स्पष्ट केले की, सीएनजी वितरणासाठी लागणाऱ्या वायूचा मोठा भाग हा महागड्या आयात केलेल्या स्पॉट एलएनजीवर अवलंबून असतो. भारतात वाढत्या मागणीमुळे सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यासाठी आयात वाढली आहे.
आयजीएलनुसार, युरोपियन TTF गॅसचे दर फेब्रुवारीच्या अखेरीस ११.३६ डॉलर प्रति MMBTU होते, ते २७ ऑगस्टपर्यंत १०५ टक्क्यांनी वाढून २३.३५ डॉलरवर पोहोचले. तसेच आशियाई JKM एलएनजीचे दर ११३ टक्क्यांनी वाढून २३.४१ डॉलर प्रति MMBTU झाले आहेत. या तुलनेत दिल्लीतील सीएनजीचे दर याच काळात केवळ ७.८ टक्क्यांनीच वाढवले गेले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात किमती गगनाला भिडल्या असल्या, तरी ग्राहकांना याचा थेट फटका बसू नये म्हणून आयजीएलने आतापर्यंत किमती नियंत्रणात ठेवल्या होत्या. मात्र, पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाढता खर्च भरून काढण्यासाठी ही 'संतुलित' दरवाढ करणे आवश्यक होते, असे आयजीएलने स्पष्ट केले आहे.