Lok Sabha Election Survey : आज लोकसभा निवडणूक झाली तर ‘एनडीए’ ३२६ जागा जिंकणार, पंतप्रधान मोदींची जादू कायम

भाजपला २६१; काँग्रेसची कामगिरी सुधारण्याची शक्यता, ‘इंडिया’ आघाडीला १८५ जागा
Lok Sabha Election survey
Rahul Gandhi, PM Narendra ModiFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ३२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जानेवारीतील ‘इंडिया टुडे-सीव्होटर मूड ऑफ द नेशन’ (एमओटीएन) सर्वेक्षणाच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये २६ जागांची घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जानेवारीच्या सर्वेक्षणात एनडीएला ३५२ जागा मिळतील, असा अंदाज होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता कायम राहण्याची शक्यता सर्वेक्षणातून दिसत असली, तरी आघाडीच्या लोकप्रियतेत काहीशी घट होत असल्याचे चित्र आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेल्या ‘४०० पार’च्या घोषणेच्या तुलनेत ३२६ जागांचा अंदाज कमी असला, तरी सत्ताधारी आघाडीवरील मतदारांचा विश्वास अद्याप कायम असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून दिसते.

‘इंडिया’ आघाडीला १८५ जागा

काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीला आज निवडणूक झाल्यास १८५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. जानेवारी २०२६ मधील सर्वेक्षणात आघाडीला १८२ जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. म्हणजेच आघाडीच्या संभाव्य जागांमध्ये केवळ तीन जागांची वाढ झाली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी मिळून २३४ जागा जिंकल्या होत्या.

भाजपच्या जागांमध्ये घट

पक्षनिहाय आकडेवारीनुसार भाजपला २६१ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जानेवारीच्या सर्वेक्षणात भाजपला २८७ जागा मिळतील, असा अंदाज होता. त्याच्या तुलनेत भाजपच्या संभाव्य जागांमध्ये २६ जागांची घट झाली आहे. मात्र, २०२४ मध्ये भाजपने जिंकलेल्या २४० जागांच्या तुलनेत सध्याचा अंदाज अधिक आहे.

काँग्रेसला मोठा फायदा

सर्वेक्षणात काँग्रेसच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसला १०६ जागा मिळण्याचा अंदाज असून जानेवारीच्या सर्वेक्षणात पक्षाला केवळ ८० जागा मिळतील, असे भाकीत करण्यात आले होते. ऑगस्ट २०२५ मधील सर्वेक्षणात काँग्रेसला ९७ जागांचा अंदाज होता. त्यामुळे सहा महिन्यांत काँग्रेसच्या संभाव्य जागांमध्ये २६ जागांची वाढ झाल्याचे दिसते.

मतांच्या टक्केवारीतही फरक

एनडीएला ४५.१ टक्के मते मिळण्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. जानेवारीतील सर्वेक्षणात एनडीएला ४७ टक्के मतांचा अंदाज होता. ऑगस्ट २०२५ मधील ४६.७ टक्क्यांनंतरची ही एनडीएची सर्वात कमी संभाव्य मतांची टक्केवारी आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला सुमारे ४४ टक्के मते मिळाली होती.

‘जेन झेड’चा प्रभाव महत्त्वाचा

२०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जेन झेड’ मतदारांचा प्रभाव महत्त्वाचा ठरण्याची शक्यता सर्वेक्षणातून अधोरेखित झाली आहे. परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून भाजपला तरुण वर्गाच्या नाराजीला सामोरे जावे लागल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. जुलैमध्ये दिल्लीत विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर केलेल्या आंदोलनाचाही या राजकीय वातावरणावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, असा संदर्भ सर्वेक्षणाच्या विश्लेषणात देण्यात आला आहे.

काँग्रेसची आक्रमक भूमिका

महिला आरक्षणासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने पक्षाची राजकीय दृश्यता वाढल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी भाजपला घेरण्यासाठी नव्या रणनीतीचा अवलंब केल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईसह विविध मुद्दे काँग्रेसने प्रभावीपणे उपस्थित केल्याचे सर्वेक्षणाच्या विश्लेषणात म्हटले आहे.

२५ हजारांहून अधिक जणांचा सहभाग

‘मूड ऑफ द नेशन’ हे इंडिया टुडे समूहाकडून गेल्या सुमारे दोन दशकांपासून वर्षातून दोनदा घेण्यात येणारे सर्वेक्षण आहे. ऑगस्ट २०२६चे सर्वेक्षण सीव्होटरने केले असून १ जुलै ते २५ ऑगस्टदरम्यान २५ हजार १८४ लोकांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. याशिवाय गेल्या सहा महिन्यांत सीव्होटरच्या नियमित ट्रॅकिंगअंतर्गत घेण्यात आलेल्या ९१ हजार ७९५ मुलाखतींचाही या निष्कर्षांसाठी वापर करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news