

Rahul Gandhi Gyanesh Kumar: कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनापूर्वी देशातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘ज्ञानेश कुमार जातील, सरकार पण जाणार आणि त्यानंतर लोकशाहीची दुरुस्ती सुरू होईल,’ असा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या पोस्टनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राहुल गांधी, काँग्रेस आणि INDIA आघाडीवर जोरदार टीका केली.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमधून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पदावरून हटण्याचा आणि केंद्रात सरकार बदलण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर देशातील लोकशाही व्यवस्था सुधारण्याचे काम सुरू होईल, असे त्यांनी म्हटले.
शुक्रवारी राहुल गांधी आणि INDIA आघाडीतील इतर खासदारांनी या मुद्द्यावर राष्ट्रपतींची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
राहुल गांधी यांच्या विधानावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी प्रतिक्रिया दिली. काही लोक देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांची विचारसरणी देशाच्या हिताची नाही, असा आरोप त्यांनी केला.
भाजप विकसित भारत घडवण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना कठोर उत्तर दिले जाईल, असेही नितीन नवीन यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असा दावा करत त्यांनी अरविंद केजरीवाल आणि INDIA आघाडीवरही टीका केली. CJPच्या नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्ये देशातील तरुण पाहत आहेत. लोकशाहीला आव्हान देण्याचे असे प्रयत्न जनता स्वीकारणार नाही, असे ते म्हणाले.
INDIA आघाडी आणि CJPवर टीका करताना नितीन नवीन म्हणाले की, जनतेने विरोधकांना नाकारले आहे. मात्र, निवडणुकीतील पराभवातून धडा घेण्याऐवजी देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
काही लोक परदेशी शक्तींच्या मदतीने राजकारण करत असल्याचाही आरोप नितीन नवीन यांनी केला. अशा लोकांचे हेतू कधीही पूर्ण होणार नाहीत, असे ते म्हणाले. विविध राज्यांमध्ये विरोधकांना मिळत असलेल्या निवडणुकीतील पराभवातून त्यांची निराशा दिसून येत असल्याचा दावाही त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या पोस्टनंतर भाजपने केलेल्या टीकेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा वेग आला आहे. निवडणूक आयोग, लोकशाही आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवरून दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष सुरू आहे. CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या राजकीय वादाचे पुढे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.