

CJP Protest Delhi: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आज (दि. १० ऑक्टोबर) कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनास दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या सुमारे ३०० आंदोलनकांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या 'कंटेंट क्रिएटर्स'नाही पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJP ने प्रस्तावित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आज सकाळी जंतरमंतरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे ३०० आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांपैकी बहुतांश विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे.
दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रणात आहे. आतापर्यंत कोठेही कोणताही गोंधळ, वाद किंवा हिंसाचार झाल्याचे वृत्त नाही. ६०० हून अधिक संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत."
रिपोर्टनुसार, आंदोलनादरम्यान सुव्यवस्था बिघडू नये म्हणून राजधानीच्या सर्व १५ जिल्ह्यांतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ६०० हून अधिक व्यक्तींना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले आहे. कडक पाळत: जमाव जमवण्यासाठी किंवा इतरांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर पाळत अधिक कडक करण्यात आली आहे.
जंतर-मंतर आणि इतर संवेदनशील भागांकडे जाणाऱ्या मार्गांवर पोलीस दलांची मोक्याच्या ठिकाणी तैनाती करण्यात आली आहे.नवी दिल्ली परिसरातील आंदोलकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करत आहेत. शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शहरातील विविध भागांत सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर कडक करण्यात आली आहे.