

CJI Suryakant parasite remark : देशाचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या 'कॉकरोच' (झुरळ) या टिप्पणीवरून देशभरात मोठा गदारोळ झाला होता. यावर चर्चा सुरू असतानाच सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा अशीच एक कडक टिप्पणी केली आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपीला जामीन नाकारताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले की, "असे लोक परजीवींसारखे असतात आणि म्हणूनच त्यांनी तुरुंगात राहणेच योग्य आहे."
बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयात सायबर फसवणुकीच्या एका प्रकरणावर सुनावणी झाली. यादरम्यान सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुन्हेगाराला जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला. याचिका फेटाळताना खंडपीठाने अत्यंत कठोर टिप्पणी केली. सायबर गुन्हेगार हे 'परजीवी' आहेत, जे लोकांची करोडो रुपयांची फसवणूक करतात आणि त्यांना पकडणेही सोपे नसते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. अशा गुन्हेगारांना तुरुंगात ठेवणेच समाजाच्या हिताचे आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आरोपीला फटकारत म्हटले, "तुम्ही लोक परजीवी आहात, जे गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालतात. सायबर गुन्हेगारांबाबत आम्हाला अत्यंत कठोर व्हावेच लागेल." सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त करताना सरन्यायाधीश म्हणाले, "तुम्ही लोक एखाद्या राज्यापुरते मर्यादित राहत नाही. तामिळनाडूमध्ये कोणाची तरी फसवणूक करता आणि तिथून थेट जम्मूमध्ये निघून जाता. तुमच्यासारखे लोक तुरुंगात राहणे यातच समाजाचे हित आहे."
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यापूर्वी एका प्रकरणात अशीच टिप्पणी केली होती, ज्यावर प्रचंड गदारोळ झाला होता. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गेल्या महिन्यात एका याचिकेवर सुनावणी करताना काही बेरोजगार तरुणांची तुलना 'कॉकरोच'शी केली होती. "बेरोजगार तरुण पुढे जाऊन मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय (RTI) कार्यकर्ते बनतात आणि नंतर यंत्रणेवरच हल्ले करू लागतात," असे ते म्हणाले होते.
या वक्तव्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांसाठी अशा शब्दांचा वापर करायला नको होता, असे म्हटले जात होते. वाद वाढल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते आणि आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे म्हटले होते. सरन्यायाधीशांनी एका निवेदनात म्हटले होते, एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मी केलेल्या तोंडी टिप्पणीचा मीडियाच्या एका घटकाने चुकीचा अर्थ लावला, हे वाचून मला दुःख झाले. हे वक्तव्य आपण "बनावट आणि खोट्या पदव्यांच्या" आधारे वकिली व्यवसायात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी केले होते, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले होते. तथापि, तोपर्यंत हा वाद खूप वाढला होता. संतप्त तरुणांनी आपला निषेध नोंदवण्यासाठी एक पक्षही स्थापन केला असून, त्याला 'कॉकरोच जनता पार्टी' असे नाव देण्यात आले आहे. आता या पक्षाला देशव्यापी आंदोलनात बदलण्याची तयारी सुरू आहे.