

CJI Surya Kant London Lecture
लंडन : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या लंडनमधील 'बर्कबेक' येथील व्याख्यानादरम्यान उपस्थितांनी त्यांच्या जुन्या वक्तव्यांवरून प्रश्न उपस्थित केल्याने गोंधळ उडाला. या प्रकारावर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी तीव्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरन्यायाधीशांच्या 'झुरळ' (Cockroach) संदर्भातील वादग्रस्त टिप्पणीची चर्चा यामुळे पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या 'बर्कबेक' येथे बुधवार, ४ जून रोजी सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांचे "कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आंतरराष्ट्रीय कायदा" या विषयावर व्याख्यान झाले. यानंतर प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थितांनी त्यांच्या अलीकडील 'झुरळ' टिप्पणीवर प्रश्न विचारल्याने वातावरण तापले. प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान एका उपस्थिताने सूर्यकांत यांना भारतातील लोकशाहीची स्थिती आणि विरोधाप्रती वाढत्या शत्रुत्वाच्या भावनेवर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतयं की, संबंधित व्यक्तीने प्रश्न विचारला की, "भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कायदेशीर अभ्यासकांकडून आम्हाला ऐकायला मिळत आहे की, भारतातील वाढत्या विरोधाच्या गळचेपीबद्दल मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. ही शत्रुत्वाची भावना काही अंशी सरन्यायाधीशांच्या भाषणातही प्रतिबिंबित होताना दिसत आहे, ज्याची खूप चर्चा झाली आहे." दुसऱ्या एका उपस्थिताने सरन्यायाधीशांना १५ मे रोजी न्यायालयात केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, ज्यावरून भारतात मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी संयोजकांनी हस्तक्षेप करत हे प्रश्न स्वीकारण्यास नकार दिला. "मी पूर्ण आदराने सांगू इच्छितो की, मी हा प्रश्न घेऊ शकणार नाही, कारण आजच्या कार्यक्रमाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा हा आहे," असे संयोजकांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमस्थळावरील व्हिडिओमध्ये तिथले वातावरण तणावपूर्ण असल्याचे दिसत आहे. चर्चा सुरू असताना काही उपस्थितांनी जागेवर उभे राहून घोषणाबाजी किंवा हातवारे करण्यास सुरुवात केली.एका क्लिपमध्ये आयोजक प्रेक्षकांना शांत राहण्याचे आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. "कृपया, सर्वांनी शांत व्हा आणि हे थांबवा," असे एक आयोजक म्हणताना ऐकू येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, उपस्थितांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि तिथल्या वादाची चर्चा रंगली आहे.
ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांनी या गोंधळावर टीका केली असून संबंधित व्यक्तींचे वर्तन अयोग्य असल्याचे म्हटले आहे.शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात उच्चायुक्तांनी म्हटले आहे की, "४ जून रोजी झालेल्या व्याख्यानानंतर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा सुरू होती, परंतु एका उपस्थिताने प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला."असे अशोभनीय वर्तन अस्वीकारार्ह आहे. सार्वजनिक संवादात पाळल्या जाणाऱ्या आदराच्या भावनेशी ते सुसंगत नाही. लोकशाही समाजात मतांमधील भिन्नता असणे स्वाभाविक आहे. मात्र, ती व्यक्त करण्याची पद्धत सुसंस्कृत आणि आदरयुक्त असली पाहिजे."
१५ मे रोजी एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुण सोशल मीडिया आणि माहितीचा अधिकार (RTI) कार्यकर्ते बनण्याकडे वळत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना, त्यांनी टिप्पणी केली होती की, असे तरुण "झुरळांप्रमाणे" समाजात "परजीवी" (Parasites) बनत आहेत. या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती आणि वाद निर्माण झाला होता. नंतर सरन्यायाधीशांनी यावर स्पष्टीकरण दिले होते की, त्यांच्या वक्तव्याचा रोख बेरोजगार तरुणांवर नसून, बोगस पदव्या घेऊन अशा कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांवर होता.