

Idli Dosa Batter Poisoning: अहमदाबादमधील चंदखेडा भागातील दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिन्याच्या एका बाळाचा आणि तिच्या ४ वर्षाच्या मोठा बहिणीचा समावेश आहे. दुसरीकडं या मुलींच्या पालकांना देखील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांनी स्थानिक बाजारातून तयार इडली डोसा बॅटर आणून ते खाल्लं आणि त्यातूनच त्यांना विषबाधा झाली असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या मुलींचा मृत्यू कशामुळे झाला याचा viscera report आल्यानंतर उलगडा होईल आम्ही या अहवालाची वाट पाहत आहेत असं सांगितलं.
मृत झालेल्यांमध्ये ३ महिन्यांची राहा प्रजापती आणि मिश्री प्रजापती वय वर्षे ४ यांचा समावेश आहे. राहाचा दुर्दैवी मृत्यू हा शनिवारी झाला. तर मिश्रीने रविवारी आपले प्राण सोडले. त्यांचे पालक विमल प्रजापती हे वीमा एजंट आहेत. तर भावना प्रजापती या गृहिणी आहेत. त्या दोघांनाही केडी हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थीर आहे.
दरम्यान, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार विमल यांनी १ एप्रिलच्या संध्याकाळी चंदखेडा येथील IOC रोज जवळील एका डेअरीमधून ३ किलो बॅटर खरेदी केलं होतं. त्या रात्री कुटुंबीयांनी या बॅटरपासून डोसा करून खाल्ला. मात्र सकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांना सतत उलट्या होण्याचा त्रास होऊ लागला. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.
मुलींचे आजोबा गौरीशंकर प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीला आई वडील आजारी पडले. त्यानंतर मुलं आजारी पडली. या सर्वांनी त्या विकत आणलेल्या बॅटरपासून तयार केलेला डोसा खाल्ला होता. ते आजारी पडल्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावू लागली.
गौरीशंकर प्रजापती यांनी सांगितलं की, तीन महिन्याच्या मुलीचे अंग थरथरू लागले अन् तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोठ्या मुलीला उपचारानंतर रूग्णालयातून सोडण्यात आलं होतं. मात्र काही वेळातच तिला देखील पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं. तिचा देखील जीव वाचू शकला नाही.'
मात्र या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला जेव्हा ४ एप्रिल पर्यंत लहान मुलीच्या मृत्यूची माहितीच पोलिसांना दिली नव्हती. संबंधित प्रशासनाला न कळवताच या मुलीवर अंत्य संस्कार करण्यात आले. ज्यावेळी मोठी मुलगी बेशुद्ध पडली आणि ५ एप्रिल रोजी तिचा देखील मृत्यू झाला त्यावेळी चंदकेडा पोलिसांना माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक जे.के. मक्वाना यांनी सांगितलं की, अपघाती मृत्यूची केस दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचे अनेक कंगोऱ्यांनी तपास देखील सुरू करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, सध्याच्या घडीला या प्रकरणातील तपास हा फॉरेन्सिक रिपोर्टवर अलवंबून आहे. सध्याच्या घडीला कोणतंही विष किंवा संशयास्पद घटक घरातून सापडलेलं नाही.
वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं की तीन महिन्याच्या बाळाने डोसा खाल्ला असण्याची शक्यता नाही कारण ती आईच्या अंगावरच दूध पीत होती. तरी देखील तिची प्रकृती खालावली. डॉक्टरांना देखील एवढी लहान मुलगी कशी मृत पावली याबबात अश्चर्य व्यक्त केलं आहे. जर तिला आईच्या दुधातून विषबाधा झाली असेल तर आईची प्रकृती जास्त गंभीर असायला हवी. मात्र दोन्ही पालक हे फार गंभीर नाहीयेत. मात्र त्यांना आयसीयूमध्येच देखरेखीखाली ठेवलं आहे.'
तपासात हे देखील समोर आलं आहे की तीन किलोपैकी २.७ किलो बॅटर हे डेअरीत परत करण्यात आलं होतं. या कुटुंबीयांनी यातील थोड्याच बॅटरचा वापर डोसा करण्यासाठी केला होता. यामुळं तपासात जास्तच गुंतागूंत निर्माण झाली आहे.
दरम्यान, डेअरी मालक केतन पटेल यांनी कोणतीही चूक झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. याच बॅचमधील बॅटर अनेक ग्राहकांना विकल्याचा दावा त्यांनी केला असून त्यांनी दिवसाला जवळपास १०० ते १२५ किलो बॅटर विकले जाते. दुसऱ्या कोणत्याही ग्राहकांना कोणती समस्या आलेली नाही. एवढंच काय आमचे कुटुंबीय देखील हेच बॅटर खातात.'
दरम्यान, फॉरेन्सिक लॅब विभागातील अधिकाऱ्यांनी डेअरी आणि घरातील बॅटरचे सॅम्पल पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.