

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावर बुधवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. बिजोरा टोल नाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना एका मद्यधुंद ट्रक चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन किन्नरांसह एकूण १० जण गंभीर जखमी झाले असून, टोल नाक्यावर काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती.
बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बिजोरा टोल नाक्यावरील 'फास्टॅग' यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाला. यामुळे उमरखेडहून यवतमाळच्या दिशेने जाणारी वाहने टोल भरण्यासाठी रांगेत उभी होती. याच दरम्यान, दोन किन्नर तेथे उभ्या असलेल्या प्रवाशांकडून पैसे मागत होते. तसेच वडद येथील शेतातून काम आटोपून घरी परतणारे तीन युवक आपल्या दुचाकीसह रांगेत उभे होते आणि पुसद येथील एक ऑटोदेखील तिथे प्रवाशांसह थांबलेला होता.
थोड्याच वेळात उमरखेडकडून महागावकडे जाणारा (एमएच ३५ एजे १८४३) क्रमांकाचा एक भरधाव ट्रक टोल नाक्याच्या दिशेने आला. ट्रकचा वेग इतका प्रचंड होता की, चालकाने समोर उभ्या असलेल्या सर्व वाहनांना अक्षरशः चिरडले. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी, ऑटो आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले.
या भीषण धडकेत किन्नर श्रीवल्ली राठोड आणि अनन्या सदावर्ते यांच्यासह दुचाकीवरील तीन युवक गंभीर जखमी झाले. तसेच ऑटोमधील मेहबूब खान अजब खान, समीर खान मेहबूब खान, मुमताजबी मेहबूब खान आणि जराबाबी शेख (सर्व रा. पुसद) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक चालक सोबनकर (रा. कोदाणमाळी, जि. गोंदिया) हा स्वतः मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून, तोदेखील या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिक आणि इतर वाहनधारकांनी तत्काळ जखमींना बाहेर काढून उमरखेड येथील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, या घटनेमुळे टोल प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. फास्टॅग यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही इशारा यंत्रणा तिथे नव्हती, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच महागावचे ठाणेदार धनराज निळे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, परंतु पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.