

CBSE 12th Results 2025
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) २०२४-२५ या शैक्षणिक सत्रासाठीचा बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर केला. या वर्षी बारावी परीक्षेचा निकाल ८८.३९ टक्के लागला आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीपेक्षा किंचित जास्त आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ५ टक्क्यांनी अधिक आहे.
विद्यार्थी त्यांचे निकाल cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.
मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.६४ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८५.७० टक्के आहे. ट्रान्सजेंडर उमेदवार गेल्या वर्षीच्या ५० टक्क्यांच्या तुलनेत यंदा १०० टक्के उत्तीर्ण झाले आहेत. एकूण १६ लाख ९२ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
यावर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पाच विभागांत विजयवाडा ९९.६० टक्के निकालांसह आघाडीवर राहिला आहे. तिरुवनंतपुरम ९९.३२ टक्के, चेन्नई ९७.३९ टक्के, बंगळूर ९५.९५ टक्के आणि दिल्ली पश्चिमचा ९५.३७ टक्के निकाल लागला आहे.
यावर्षी, सीबीएसईच्या एकूण निकालात थोडीशी सुधारणा झाली आहे. यंदा उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.३९ टक्के आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.४१ टक्के अधिक आहे. या परीक्षेसाठी १७ लाख ४ हजार ३६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख ९२ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १४ लाख ९६ हजार ३०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यंदा सीबीएसईने बारावीच्या परीक्षेच्या पद्धतीत ५० टक्के क्षमता आधारित प्रश्नांचा समावेश करत एक मोठा बदल केला होता.
results.cbse.nic.in या सीबीएसई निकाल पोर्टलला भेट द्या.
CBSE Class 10 अथवा 12 board Result 2025 या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर, शाळा क्रमांक, ॲडमिट कार्ड आयडी नमूद करा.
सबमिटवर क्लिक करा.
तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
बारावीनंतर लगेच सीबीएसईने दहावीचा निकालही जाहीर केला. या परीक्षेत ९३.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूणउत्तीर्ण होण्याचे प्रमाण ०.०६ टक्के अधिक आहे. तसेच मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा २.३ टक्के अधिक आहे.