

Maharashtra SSC Result 2025 Pass Percentage Drops
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज (दि.१३) दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यंदा १० वीचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदा उत्तीर्णतेचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत १.७१ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे राज्यातील माध्यमिक शिक्षणावर चिंतेचे चिंतेचे ढग आहेत.
विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दहावीचा निकाल केव्हा लागणार? याविषयीची उत्सुकता लागली होती. अखेर आज (दि.१३) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाने यावर्षी दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला. कोकण विभागाने ९८.८२ टक्केवारीसह अव्वल स्थान पटकवले. तर मुलींचा एकूण निकाल ९६.१४ टक्के लागला असून, यंदादेखील मुलींनीच दहावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असून, तो ९०.७८ टक्के आहे.
कोकण विभागाने ९८.८२ टक्केवारीसह याही वर्षी १० वीच्या निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ आहे. तर मुलांचा उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९२.३१ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३.८३ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे इयत्ता १० वीच्या परीक्षेत यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे.
यंदा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.९१ टक्के होती. या तुलनेत यंदा १० वीच्या निकालात १.७१ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी २०२३ च्या तुलनेत थोडी वाढली होती. पण ती यंदा पुन्हा घटली आहे. २०२३ मध्ये, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ टक्के होती, जी २०२२ च्या तुलनेत ३.१८ टक्क्यांनी कमी होती. निकालात चढ-उताराचा आलेख असल्याने राज्याच्या माध्यमिक शिक्षणावर चिंतेचे ढग आहेत.
वर्ष : उत्तीर्णतेची टक्केवारी
२०२४ : ९५.८१ %
२०२३ : ९३.८३ %
२०२२ : ९६.९४ %
२०२१ : ९९.९५ %
२०२० : ९५.३ %