Budget 2022 : …आणि विरोधकांमध्ये मिसळले पंतप्रधान मोदी

Budget 2022 : …आणि विरोधकांमध्ये मिसळले पंतप्रधान मोदी
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सदनात वेगळेच चित्र पहावयास मिळाले. सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण झाल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज बुधवारपर्यंत तहकूब केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आसनावरुन उठून विरोधी बाकांकडे गेले व तेथे विरोधी सदस्यांत मिसळले. सहसा पंतप्रधान हे विरोधी बाकांकडे कधी जात नाहीत, पण मोदी याला अपवाद ठरले.

प. बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) यांच्यादरम्यान मोठी दरी निर्माण झालेली आहे. मात्र असे असूनही मोदी यांनी तृणमूलचे सदस्य सुदीप बंडोपाध्याय आणि सौगत राय यांच्याशी संवाद साधला. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्याचे राज्यपाल जगदीप धनकड यांच्यात शाब्दिक वाक्युध्द रंगले आहे. या पार्श्‍वभूमीवर धनकड यांना हटविण्याची मागणी आपण पंतप्रधानांकडे केल्याचे नंतर सौगत राय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन आणि केरळमधील काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांच्याशी मोदी यांनी चर्चा केली. गेल्या डिसेंबर महिन्यात गोवा मुक्‍ती संग्राम दिन साजरा झाला होता. त्या कार्यक्रमास आपण उपस्थित होतो. सदर कार्यक्रमाबाबत मोदी यांनी आपल्याकडे विचारणा केल्याचे सार्दिन यांनी सांगितले. सीतारामन यांचे अर्थसंकल्पाचे भाषण संपल्या नंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी सदनाबाहेर निघून गेले होते. त्यामुळे मोदी विरोधी सदस्यांसमवेत संवाद साधत असताना राहुल गांधी तिथे नव्हते.

मोदी यांनी काँग्रेसचे (Congress) नेते अधीर रंजन चौधरी तसेच द्रमुक नेते ए. राजा यांच्याशी हस्तांदोलन केल्याचे चित्रही पहावयास मिळाले. याशिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्‍ला, द्रमुकचे दयानिधी मारन, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन, वायएसआर काँगे्रेसचे कृष्णा देवरायलू, अपक्ष नवनीत राणा यांच्याशी मोदी यांनी यांनी संवाद साधला.

मोदी यांचे सर्वात छोटे भाषण

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पावर बुधवारी सकाळी 11 वाजता आपण सविस्तर प्रतिक्रिया देणार आहोत, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदनही केले. सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेला चौथा अर्थसंकल्प होता. याआधीच्या तीन अर्थसंकल्पीय भाषणापेक्षा त्यांचे आजचे भाषण कमी वेळ म्हणजे एक तास 31 मिनिटे चालले. गतवर्षी त्यांचे 1 तास 48 मिनिटे भाषण झाले होते. तत्पूर्वी वर्ष 2020 मध्ये सीतारामन यांचे सर्वात मोठे म्हणजे तब्बल 2 तास 40 मिनिटे भाषण चालले होते. संसदेत आतापर्यंत झालेले सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण म्हणून त्याकडे पाहिले जाते. तत्पूर्वी 2019 मध्ये त्यांचे 2 तास 17 मिनिट भाषण झाले होते.

हे ही वाचलं का 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news