Delhi Crime News: कंपनीच्या माजी सहकाऱ्याला भेटायला गेला अन् परतलाच नाही; कारमध्ये 7 तास मृतदेह, पुढे जे घडलं ते धक्कादायक

Yuvraj Singh Manchanda Murder: माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेलेल्या 31वर्षीय HR प्रोफेशनल युवराज सिंह मंचंदाची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
Delhi Crime News
Delhi Crime NewsPudhari
Published on
Updated on

Yuvraj Singh Manchanda Murder: माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेलेल्या 31 वर्षीय HR प्रोफेशनलची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवराज सिंह मंचंदा असे मृत तरुणाचे नाव आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात त्याची माजी सहकारी अन्या वात्स आणि तिचा साथीदार संयम सचदेवा यांना अटक केली आहे. या हत्येमागे आर्थिक वाद असल्याचा पोलिसांना संशय असून, या दिशेने तपास सुरू आहे.

युवराज आपल्या कुटुंबासह दिल्लीतील सरिता विहार येथे राहत होता. तो एका नामांकित रिअल इस्टेट कंपनीत काम करत होता. 6 सप्टेंबर रोजी तो लाजपत नगरमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्याआधी त्याने बहिणींसोबत खरेदी केली होती. त्यानंतर गुरुग्राममध्ये एका मीटिंगसाठी जाणार असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले.

संध्याकाळी सुमारे 7 वाजता युवराजने कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधला. आपण रात्री 10 वाजेपर्यंत घरी परतू, असे त्याने सांगितले. मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. कुटुंबीयांनी अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु युवराजशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर 11 सप्टेंबर रोजी त्याच्या बहिणीने लाजपत नगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर FIR नोंदवण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी युवराजचे कॉल डिटेल रेकॉर्ड, इंटरनेट प्रोटोकॉल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये युवराजचा शेवटचा संपर्क त्याची माजी सहकारी अन्या वात्स हिच्याशी झाल्याचे समोर आले. गुरुग्रामला जात असल्याचे युवराजने कुटुंबीयांना सांगितले होते आणि तो अन्याला भेटणार असल्याची माहितीही तपासात समोर आली.

यानंतर अन्या पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात आली. युवराज आणि अन्याचे मोबाइल फोन बंद असल्याने पोलिसांनी तिच्या हालचालींचा तपास सुरू केला. तपासादरम्यान अन्या एका नवीन मोबाइल क्रमांकाचा वापर करत असल्याचे पोलिसांना आढळले. पाळत ठेवली असता तिचे लोकेशन उत्तराखंडमध्ये असल्याचे समोर आले.

यानंतर दिल्ली पोलिसांचे पथक उत्तराखंडमध्ये पोहोचले आणि अन्यासोबत संयम सचदेवालाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघांनी चौकशीदरम्यान युवराजच्या हत्येत सहभाग असल्याचे सांगितले.

पोलिसांच्या तपासानुसार, युवराज स्वतःच्या कारमधून गुरुग्रामला गेला होता. कारमध्येच त्याचा अन्या आणि संयमसोबत वाद झाल्याचे समोर आले आहे. या वादानंतर युवराजची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराजवर कारमध्ये दोन वेळा गोळी झाडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Delhi Crime News
Smartphone Sales: मोबाईल विक्रीचा दशकातील नीचांक! 'मेमरी चिप' महागल्याने मोबाईल खरेदी 'सायलंट मोड'वर, विक्रीत कमालीची घट

हत्येनंतर युवराजचा मृतदेह त्याच कारमध्ये तब्बल सात तास ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची, याबाबत आरोपी विचार करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर गुरुग्राममधील त्यांच्या घराजवळील एका नाल्यात मृतदेह टाकल्याचा आरोप आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दोघेही उत्तराखंडला पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी गुरुग्राममधील बादशाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह बराच कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी मृतदेहाचे फोटो युवराजच्या कुटुंबीयांना दाखवल्यानंतर त्यांनी तो युवराजच असल्याची ओळख पटवली.

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अन्या वात्स आणि युवराज हे पूर्वी एकाच कंपनीत काम करत होते. दोघांनी 2022 मध्ये एका नामांकित रिअल इस्टेट कंपनीत एकत्र काम केले होते. सध्या अन्या बेरोजगार होती. कंपनीतून तिची हकालपट्टी करण्यात आली होती. तिच्या नोकरी जाण्यामागे काही आर्थिक अनियमितता कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र याबाबत अद्याप तपास सुरू असून, नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. संयम सचदेवाही बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Delhi Crime News
Abhishek Sharma: 96 विरुद्ध 86! अभिषेक शर्माने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; 30 चेंडूत शतक ठोकून रचला इतिहास

पोलिसांनी अन्या आणि संयमला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलिसांकडून हत्येमागील नेमका वाद काय होता, युवराजची हत्या नेमकी कशी करण्यात आली, गोळीबार झाला होता का, हत्येत दोघांची भूमिका काय होती आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामागे आणखी कोण सहभागी होतं का, याचा तपास केला जात आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून फॉरेन्सिक आणि तांत्रिक पुरावेही गोळा केले जात असून, तपास पूर्ण झाल्यानंतर हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news