

Bihar Assembly Election
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कुमार गौरव यांची वॉर रूम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या अनूमतीने संघटना सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली. कुमार गौरव हे झारखंड राज्य युवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. ते झारखंड काँग्रेसचे सरचिटणीस आणि झारखंड युवक काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होऊ शकते. मात्र काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी आधीपासूनच जोरदार सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने बिहारचा दौरा केला आहे. अलीकडेच त्यांनी बिहारमध्ये दरभंगा दौरा करत विद्यार्थी, युवकांशी संवाद साधला होता आणि ‘फुले’ चित्रपटही बघितला होता.
भाजप नितीश कुमार यांच्या जदयुसोबत तर काँग्रेस लालूप्रसाद यादव यांच्या राजदसोबत निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही पक्षाने आपली अधिकृत युती किंवा आघाडी जाहीर केली नाही. सर्वच पक्ष आपापल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच बिहारमध्ये सुरू असलेल्या गोष्टी पाहता ऐन वेळेवरही युती आघाडीच्या बाबतीत काही नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे.