बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘चिराग’ला शह देण्यासाठी भाजपचा ‘पारस’ पर्याय
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या(लोजपा) वेगळ्या सुराची चिंता भाजपला वाटत आहे. त्यामुळे लोजपचा धगधगता 'चिराग' शह देण्यासाठी भाजपने 'पारस' अस्त्र काढले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (दि.29) पशुपती कुमार पारस यांची भेट घेऊन चिराग पासवान यांना संकेत दिले. त्यानंतर चिराग पासवान यांनी भाजपशी जवळीक दाखवण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भाजपपासून वाढत्या अंतराचे आरोप फेटाळून लावले. वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक, लॅटरल एंट्री, क्रिमी लेयर आणि अनुसूचित जातीचे उप-वर्गीकरण या मुद्द्यांवर चिराग पासवान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील माझे प्रेम अतूट आहे. मी त्यांच्यापासून अविभाज्य आहे. जोपर्यंत ते पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत राहीन. भाजपची इच्छा असेल तर आगामी बिहार विधानसभा निवडणूक एनडीएचा सहयोगी म्हणून लढण्यास तयार असल्याचे पासवान यांनी सांगितले. यापूर्वी चिराग पासवान यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक, लॅटरल एंट्री या मुद्द्यांवर सरकारला वेगळी भूमिका घेत अडचणीत आणले होते. झारखंड विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार चिराग पासवान यांचा सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजपने व्यूहरचना सुरू केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपच्या रणनीतीकारांनी चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला लावले. तसेच त्यांना एनडीएसोबत बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे विधान करायला लावले. पारस म्हणाले की, ते चांगल्या वेळेची वाट पाहत आहेत आणि गृहमंत्री शाह यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व करण्याचे आश्वासन दिले आहे. पारस सक्रिय झाल्यामुळे चिराग पासवान यांची वृत्तीही मवाळ झाली आहे. त्यांना लवकरच भाजप हायकमांडला भेटून झारखंड विधानसभा आणि बिहार निवडणुकीबाबत चर्चा करायची आहे.