पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये होत असलेल्या आगामी विधानसभेच्या निवडणूकीत राजदचे नेते व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे इंडीया आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. ‘इंडीया’ आघाडीच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण आघाडीने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणाचेच नाव घोषीत केलेले नाही. यावर्षी ऑक्टोबर किवा नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभेच्या निवडणूका होत आहेत.
या आघाडीमध्ये सामिल झालेले पक्ष पुन्हा एकदा एकत्र बैठक घेऊन जाहीरनामा व कोणाला किती जागा मिळणार याचा विचार करुन नंतर घोषणा करण्यात येणार आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस, राजद, भाकप, भाकप(मार्क्सवादी- लेनीनवादी) भाकप (मार्क्सवादी) आणि विकासशील इन्सान पार्टी या सहा पक्षांचा समावेश आहे.
नवी दिल्ली येथे १६ एप्रिल रोजी काँगेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व राहूल गांधी यांच्याशी तेजस्वी यादव यांची भेट झाली यानंतर दोन दिवसातच इंडिया आघाडीची बैठक झाली. यामध्ये तेजस्वी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बिहार काँगेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरु यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली.
आता सर्वपक्षातून महत्वाच्या नेत्यांची एक समिती तयार केली जाईल. माध्यमांशी संवाद साधने, प्रचारयंत्रणा राबविणे, सर्व पक्षांमध्ये समन्वय राखणे या सर्वांची जबाबदारी या समितीवर असणार आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी म्हटले की आम्ही इंडिया आघाडीने बिहामधील परिस्थिती, गरीबी, बेरोजगारी, स्थलांतरण यावर चर्चा केली.ते म्हणाले की सध्याच्या सरकाविषयी जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. या सरकारच्या काळात बिहारमध्ये कायदा व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.