

Bihar election VVPAT slips found Samastipur EC investigation:
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील सरायरंजन विधानसभा मतदारसंघात निवडणूक काळात मोठा गोंधळ झाला आहे. आज शनिवारी (8 नोव्हेंबर) सकाळी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात VVPAT स्लिप्स सापडल्या. या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि देशभरात एकच खळबळ उडाली.
या घटनेनंतर राष्ट्रीय जनता दलने (RJD) निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत विचारलं, “समस्तीपूरच्या सरायरंजन मतदारसंघातील KSR कॉलेजजवळ रस्त्यावर EVMमधून निघालेल्या VVPAT स्लिप्स टाकलेल्या आढळल्या. त्या तिथं कशा आल्या? कोणाच्या इशाऱ्यावर हे झालं? निवडणूक आयोग उत्तर देणार का?” आरजेडीनं आरोप केला आहे की, बिहारच्या निवडणुकीत लोकशाहीवर दरोडा टाकला जात आहे, आणि आयोग या सर्वावर मौन बाळगत आहे.
स्थानिक माहितीनुसार, या VVPAT स्लिप्स शीतलपट्टी गावाजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्या. 6 नोव्हेंबर रोजी या भागात मतदान पार पडलं होतं. सकाळी काही गावकऱ्यांनी कचऱ्यात पक्षचिन्हांसह स्लिप्स पाहिल्या आणि पोलिसांना माहिती दिली.
समस्तीपूरचे जिल्हाधिकारी रोशन कुशवाहा तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकाराची चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात समोर आलं की या स्लिप्स ‘मॉक पोल’ (प्रायोगिक मतदान) दरम्यानच्या आहेत, ज्या चुकून फेकल्या गेल्या असाव्यात.
डीएम कुशवाहा म्हणाले “सरायरंजन मतदारसंघातील डिस्पॅच सेंटरजवळ काही स्लिप्स सापडल्या. आम्ही त्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि दोन अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी व निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.”
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की, “समस्तीपूरचे डीएम स्वतः घटनास्थळी चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या मॉक पोलच्या स्लिप्स आहेत, त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर कोणताही परिणाम झाला नाही.” त्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला झाले,
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला,
आणि मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.
सरायरंजन मतदारसंघात 6 नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी VVPAT स्लिप्स सापडल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.