

Bride Shot On Wedding Stage In Bihar
बक्सर: लग्नमंडपात सनई-चौघडे वाजत होते, सर्वजण आनंदात होते, स्टेजवर वधू-वर उभे होते, त्याचवेळी एका तरूणाने वधूवर गोळी झाडली. एकतर्फी प्रेमातून बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील चौसा येथे मंगळवारी ही खळबळजनक घटना घडली. वधू आरती कुमारी (वय १८) ही गंभीर जखमी झाली असून, सध्या ती वाराणसी येथील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे.
मल्लाह टोला येथे नंदजी मल्लाह यांची मुलगी आरती हिचा विवाह सोहळा सुरू होता. वधू-वर एकमेकांना हार घालण्याचा विधी सरू सुरू असताना आरती आणि तिचा होणारा पती स्टेजवर उभे होते. त्याच वेळी एक बुरखा घालून तरूण अचानक स्टेजवर चढून आरतीच्या पोटामध्ये गोळी झाडली. लग्नातील मोठ्या आवाजाच्या संगीतामुळे सुरुवातीला गोळीचा आवाज कोणाच्याही लक्षात आला नाही. मात्र, काही क्षणांतच आरती रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याने लग्नमंडपात एकच खळबळ उडाली.
आरतीला तातडीने बक्सरच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने वाराणसीला हलवण्यात आले. शुद्ध हरपण्यापूर्वी आरतीने आपल्या कुटुंबाला हल्लेखोराचे नाव सांगितले. ती म्हणाली, "दीनबंधूने माझ्यावर गोळी झाडली."
संशयित आरोपी दीनबंधू हा आरतीचा शेजारी असून तो गेल्या दोन वर्षांपासून तिचा पाठलाग करत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यापूर्वीही आरतीचे लग्न ठरले असताना दीनबंधूने मुलाकडच्या लोकांना त्रास देऊन ते लग्न मोडले होते. आरतीचा या संबंधांना विरोध होता, मात्र आरोपी तिला सतत त्रास देत होता.
घटनेनंतर आरोपी दीनबंधू फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासात हा प्रकार वैयक्तिक वादातून आणि एकतर्फी प्रेमातून घडल्याचे दिसत आहे. आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस निरीक्षक चंदन कुमार यांनी दिली.