

Bengaluru Crime News
बंगळूर: बंगळूरमध्ये २२ वर्षीय तरुणीचा भाड्याच्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आत्महत्येचा बनाव रचून खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून मृत तरुणीचा प्रियकर चंदन उर्फ चंद्रशेखर याला अटक करण्यात आली आहे. विष प्राशन केल्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. उपचारानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणीची ओळख भावनी एस अशी असून ती बंगळूरच्या पश्चिम भागातील एका मोबाईल फोन शोरूममध्ये काम करत होती. ती भाड्याच्या घरात राहत होती. भावनी आणि चंद्रशेखर यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी वर्षभरापूर्वी कुटुंबीयांना न सांगता विवाह केल्याचे समोर आले आहे. मात्र, चंद्रशेखरचे यापूर्वीही लग्न झाले असून त्याला पहिल्या पत्नीपासून सहा वर्षांचे मूल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१३ जून रोजी भावनीच्या मृत्यूची माहिती समोर आली. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर भावनी आणि चंद्रशेखरचा एक फोटो पोस्ट करण्यात आला होता. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त चंद्रशेखरनेच हा फोटो अपलोड केल्याचा संशय आहे. हा फोटो पाहून भावनीच्या नातेवाईकांना संशय आला.
भावनीला वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने तिच्या वडिलांनी घरमालकाशी संपर्क साधला. त्यानंतर घरमालक आणि शेजाऱ्यांनी घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला असता भावनी मृत अवस्थेत आढळली. तर चंद्रशेखर बेशुद्ध पडलेला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भावनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुटुंबीयांनी नुकतीच तिच्या लग्नाची तयारी सुरू केली होती आणि पुढील आठवड्यात तिचा साखरपुडा करण्याचे नियोजन होते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, भावनीने ही माहिती चंद्रशेखरला दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला असावा.
प्राथमिक तपासात पोलिसांना असा संशय आहे की, चंद्रशेखरने भावनीला सोबत विष प्राशन करून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. मात्र, विष घेतल्यानंतर भावनीला उलटी झाल्याने तिच्या शरीरातून विष बाहेर पडले. त्यानंतर चंद्रशेखरने तिचा गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर स्वतःवर संशय येऊ नये म्हणून त्याने अधिक प्रमाणात विष प्राशन केल्याचेही तपासात समोर आले आहे.
भावनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून चंद्रशेखर सध्या पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवालांची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे गेल्या वर्षभरापासून त्या घरात एकत्र राहत होते. त्यांनी पती-पत्नी असल्याचे सांगितले होते.