

Bareilly News
बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथील एक प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. येथे धावत्या रेल्वेमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून तत्कालीन पोलिस महानिरीक्षक (IG) डॉ. राकेश सिंह यांनी जीआरपी कॉन्स्टेबल तौफिक अहमद यांना सेवेतून बडतर्फ केले होते. पण आयजी राकेश सिंह यांची मुलगी आणि पेशाने वकील असलेल्या अनुरा सिंह यांनी तौफिकचा खटला लढवला आणि त्याला त्याची गेलेली नोकरी परत मिळवून दिली.
विशेष म्हणजे पोलिस अधिकारी असलेल्या वडिलांनी तौफिक यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली होती आणि त्यांच्या मुलीने न्यायालयीन लढाई जिंकत त्यांची नोकरी परत मिळवून दिली. यामुळे या प्रकरणाची चर्चा सगळीकडे होत आहे. दरम्यान, त्याच्यावरील विनयभंगाचा खटला न्यायालयात सुरूच राहणार आहे.
ही घटना १३ जानेवारी २०२३ रोजीची आहे. पिलीभीत येथील एका विद्यार्थिनीने तौफिक अहमद यांच्याविरुद्ध विनंयभगाचा आरोप करत जीआरपी जंक्शन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तौफिक विरोधात पॉक्सो कायद्यातर्गंत कारवाई केली. तौफिकला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. विभागीय चौकशीतही तौफिक दोषी आढळून आला.
तत्कालीन पोलिस महानिरीक्षकांनी तौफिक यांना सेवेतून बडतर्फ केले. त्यानंतर तौफिक यांनी त्याच्यावरील बडतर्फीच्या कारवाईला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले. आयजी डॉ. राकेश सिंह यांची मुलगी आणि वकील अनुरा सिंह यांनी तौफिक यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी तौफिक यांच्यावरील बडतर्फी कारवाईचा आदेश रद्द करण्याची मागणी केली.
न्यायालयाने दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल दिला. तौफिक यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई चुकीचे असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने विभागीय चौकशी अहवाल आणि त्यांच्यावरील बडतर्फीच्या कारवाईचा आदेशही रद्द केला. न्यायालयाने तौफिक यांना पुन्हा पोलिस सेवेत रुजू करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. तौफिक यांना पुन्हा सेवेत घ्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
अनुरा सिंह यांनी तौफिक यांच्या बाजूने खटला लढवत त्यांना त्यांची नोकरी परत मिळवून दिली. पण तौफिक विरुद्धचा विनयभंगाचा खटला न्यायालयात सुरूच राहणार आहे. या प्रकरणात अधिक सुनावणी अजून झालेली नाही. ते या प्रकरणी दोषी आहेत की नाही? हे आता न्यायालयात सिद्ध होणार आहे.