

Kavita Kumari Home Guard Viral Video : "कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो!" प्रख्यात हिंदी कवी दुष्यंत कुमार यांची ही प्रसिद्ध गझल झारखंडच्या कविता कुमारी यांनी ऐकली किंवा वाचली नसेल; पण यातील प्रत्येक शब्द त्या प्रत्यक्ष जगल्या आहेत. पतीच्या निधनानंतर मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी २७ वर्षीय कविता यांनी 'होमगार्ड' भरतीचा निर्धार केला. धावण्यासाठी लागणारा ट्रॅकसूट नाही किंवा बूट नाहीत, तरीही याचा बाऊ न करता त्या थेट मैदानात उतरल्या आणि साडी नेसून, अनवाणी पायांनी तब्बल १,६०० मीटर धावून त्यांनी ही चाचणी पार पाडली. आपल्या चिमुकल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी त्यांचा अनवाणी धावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कविता कुमारी या दोन मुलांच्या आई आहेत. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. आपल्याला एक कायमस्वरूपी उत्पन्न असावे यासाठी त्यांनी होमगार्ड भरतीत उतरण्याचा निर्णय घेतला. झारखंड होमगार्ड भरती प्रक्रियेअंतर्गत रामगड येथील सिधू-काठू स्टेडियमवर मैदानी चाचणीचा सराव (ट्रायल) आयोजित करण्यात आला होता. या चाचणीत कविता जेव्हा खेळाचे कपडे सोडून थेट अंगावरची साडी खोचून आणि अनवाणी पायांनी १६०० मीटर धावण्यासाठी मैदानात उतरल्या, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. कविता कुमारी यांचा अनवाणी धावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.
कविता यांचे पती दीपक कुमार महतो यांचे २०२३ मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर मुलांचे संगोपन, घरखर्च आणि सासू-सासऱ्यांची जबाबदारी अचानक कविता यांच्यावर येऊन पडली. पतीने घेतलेल्या वैद्यकीय उपचारांमुळे आधीच कुटुंबावर सुमारे ६ लाख रुपयांचे कर्ज झाले होते. कर्ज फेडण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कविता यांनी वीटभट्टीवर मजुरी केली. त्यांनी काही काळ झारखंडमधील रामगडमध्ये खासगी सिक्युरिटी गार्ड म्हणूनही काम केले, मात्र उशिराच्या शिफ्टमुळे गावात परतणे कठीण झाल्याने ते काम सोडावे लागले.
अशा कठीण परिस्थितीत होमगार्ड भरतीची जाहिरात आली. कविता यांनी कायमस्वरूपी रोजगारासाठी होमगार्ड भरतीत उतरण्याचा निर्णय घेतला. रामगडमधील २०२६ च्या होमगार्ड भरतीमध्ये २८४ जागांसाठी तब्बल १६ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. यात पहिल्या टप्प्यात १६०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी आणि गोळाफेक अशा मैदानी चाचण्या होणार असून, त्यानंतर लेखी परीक्षा होईल. येत्या २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही प्रत्यक्ष भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
कविता यांच्याकडे प्रशिक्षकाची फी भरायला किंवा धावण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करायला पैसे नव्हते. त्यांनी थेट यूट्यूबचा आधार घेतला. यूट्यूबवर धावण्याचे, व्यायामाचे व्हिडिओ पाहून पहाटे गावातच सराव सुरू केला. या दरम्यान दुलमी येथील 'HMT फिजिकल अकॅडमी' चालवणारे आणि होमगार्ड असलेले अजय करमाळी यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कविता यांना त्यांची माहिती मिळाली. अजय हे ग्रामीण भागातील तरुणांना मोफत ट्रेनिंग देतात. कविता यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि सरावाला सुरुवात केली.
४ ऑक्टोबर रोजी उमेदवारांना मैदानाची सवय व्हावी म्हणून सिधू-काठू स्टेडियमवर मोफत सराव चाचणी आयोजित करण्यात आली होती. इतर उमेदवार ट्रॅकसूट आणि स्पोर्ट्स शूज घालून आले असताना कविता साडी आणि चप्पल घालून पोहोचल्या. धावण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी पायातील चप्पल बाजूला सरकावली आणि साडी खोचून त्या धावू लागल्या!
महिलांसाठी ठरवून दिलेली १० मिनिटांची वेळेची अट कविता यांनी अतिशय सहजरीत्या पार केली आणि पूर्ण गुण मिळवले. त्या केवळ १६०० मीटर धावल्या नाहीत, तर गरिबी, मुलांचे संगोपन आणि संपूर्ण कुटुंबाच्या जबाबदारीची शर्यत जिंकल्या.
होमगार्ड भरतीमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असून, त्यात विधवा महिलांसाठी स्वतंत्र ५ टक्के आरक्षण आहे. कविता यांच्यासाठी ही केवळ नोकरी नसून सन्मानाने जगण्याची संधी आहे. त्यांचा धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डूमरीचे आमदार जयराम कुमार महतो यांनी कविता यांना ट्रॅकसूट आणि रनिंग शूज भेट दिले. आता जेव्हा त्या पुन्हा मैदानात सरावासाठी उतरल्या, तेव्हा त्यांच्या पायात योग्य बूट आणि अंगावर स्पोर्ट्स कपडे होते. मात्र त्यापूर्वी त्यांनी केलेला संघर्ष एका व्हायरल व्हिडिओमुळे आज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी बनला आहे.