

Auto Sales October 2025
नवी दिल्ली :सणासुदीचा काळ, केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये केलेली कपात आणि ग्राहकांकडून वाढलेली जोरदार मागणी यामुळे ऑटो क्षेत्रासाठी ऑक्टोबर महिना 'बंपर' ठरला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा, एस्कॉर्ट्स आणि स्कोडा यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी विक्रमी विक्री नोंदवली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये त्यांच्या वाहनांची एकूण विक्री २६ टक्क्यांनी वाढून १,२०,१४२ युनिट्स झाली. देशांतर्गत SUV ची विक्री ३१ टक्क्यांनी वाढून ७१,६२४ युनिट्स झाली, जी मागील वर्षी याच महिन्यात ५४,५०४ युनिट्स होती. महिंद्राच्या व्यावसायिक वाहनांची विक्रीही चांगली राहिली. ऑक्टोबरमध्ये त्यांची विक्री १४ टक्क्यांनी वाढून ३१,७४१ युनिट्सवर पोहोचली.
महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे सीईओ नलिनिकांत गोलागुंटा यांनी सांगितले, “ऑक्टोबरमध्ये SUV ची विक्री ३१ टक्क्यांनी वाढून ७१,६२४ युनिट्स झाली, जो एका महिन्यात आमच्या SUV विक्रीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे.”
टोयोटा किर्लोस्कर मोटरने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये त्यांची एकूण विक्री ३९ टक्क्यांनी वाढून ४२,८९२ युनिट्स झाली. मागील वर्षी याच महिन्यात हा आकडा ३०,८४५ युनिट्स होता. कंपनीने हे देखील सांगितले की ऑक्टोबरमध्ये त्यांनी २,६३५ युनिट्सची निर्यात केली.
कृषी आणि बांधकाम उपकरणे बनवणाऱ्या एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडने ऑक्टोबर २०२५ मध्ये एकूण ट्रॅक्टर विक्रीत ३.८ टक्क्यांनी वाढ होऊन ती १८,७९८ युनिट्सवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात १८,११० युनिट्स होती. देशांतर्गत विक्री ३.३ टक्क्यांनी वाढून १८,४२३ युनिट्सवर पोहोचली आहे, जी ऑक्टोबर २०२४ मध्ये १७,८३९ युनिट्स होती.
स्कोडा ऑटो इंडियाने ऑक्टोबर २०२५ मध्ये ८,२५२ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. कंपनीच्या मते, ही त्यांची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री आहे.