

Ahmedabad PG Student Assault Case : अहमदाबाद शहरातील जोधपूर भागातील एका सोसायटीच्या टेरेसवर २४ वर्षांच्या तरुणीचा गळा वायरने आवळून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. आनंदनगर पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षक धर्म सिंग (वय २७, रा. हरडोई, उत्तर प्रदेश) याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी अवघ्या सहा दिवसांपूर्वीच या सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून कामावर रुजू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शहरात इंटीरियर डिझायनिंगचे शिक्षण घेत असून सोसायटीत पेइंग गेस्ट (PG) म्हणून राहते. शनिवारी रात्री ती शतपावली करण्यासाठी टेरेसवर गेली होती. आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने स्पष्ट नकार देताच नराधमाने तिच्यावर हल्ला केला. गळा तारेने आवळून केला तिला गप्प केले. यानंतर तिच्यावर अत्याचार केला.
अत्याचार केल्यानंतर आरोपी सुरक्षारक्षक पीडितेचा मोबाईल फोन हिसकावून घेऊन टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद करून पसार झाला. नराधम निघून गेल्यानंतर तरुणीने मदतीसाठी आरडाओरड केली. खाली राहणाऱ्या रहिवाशांनी तात्काळ टेरेसवर धाव घेत तिची सुटका केली आणि तिला रुग्णालयात दाखल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
सेक्टर-१ चे जेसीपी नीरज बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी आरोपी लिफ्टने टेरेसवर जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. झोन-७ चे डीसीपी शिवम वर्मा यांनी सांगितले की, पीडितेची प्रकृती सध्या स्थिर असली तरी ती तीव्र मानसिक धक्क्याखाली आहे. आरोपीने तिला मारहाण करून गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता.
आरोपी गेल्या चार वर्षांपासून विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये काम करत होता. पीडित तरुणीच्या दैनंदिन वेळेची आरोपीला आधीपासून माहिती होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, सुरक्षारक्षकाचे पोलीस पडताळणी आणि नोंदणी केली होती की नाही, यासंदर्भात संबंधित सिक्युरिटी एजन्सीचीही कसून चौकशी केली जाणार आहे.