

Mohan Bhagwat PM Modi Successor 2029 Election Leadership:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल देशात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. भाजपने मात्र यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की, 2029 ची लोकसभा निवडणूकही मोदींच्याच नेतृत्वात लढवली जाईल. याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
एका कार्यक्रमात भागवत यांना विचारण्यात आले, “मोदीजींनंतर पुढचा पंतप्रधान कोण होईल?”
यावर त्यांनी अत्यंत संयमाने प्रतिक्रिया दिली. भागवत म्हणाले, “हा प्रश्न माझ्या अधिकार क्षेत्राबाहेरचा आहे. याबाबत मी मत देऊ शकत नाही. मी फक्त शुभेच्छा देऊ शकतो.”
त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, “मोदीजींनंतर कोण येणार हे ठरवण्याचा अधिकार मोदीजी आणि भाजपचा आहे.” अलीकडे भाजपच्या “रिटायरमेंट पॉलिसी”वरून पुढचा नेता कोण असू शकतो, यावर बरीच चर्चा होत होती. मात्र भाजपने यावर स्पष्ट भूमिका घेत या चर्चांना पूर्ण विराम दिला. प्रधानमंत्री मोदी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला आहे.
एनडीटीवीच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ठामपणे सांगितले “इतर कोणी असू शकेल याचा विचार करण्याची गरजच नाही. पंतप्रधान मोदी पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि तेच 2029 मध्येही भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करतील.”
फडणवीसांनी मोदींच्या कार्यशैलीची प्रशंसा करताना सांगितले—
“मोदीजी 40 वर्षांच्या व्यक्तीपेक्षा जास्त कष्ट करतात.”
“ते दिवसाचे 17 तास काम करतात आणि मीटिंगमध्ये कधीही थकलेले दिसत नाहीत.”
“ते शरीराने आणि मनाने पूर्णपणे सक्षम आहेत तोपर्यंत दुसऱ्या पर्यायाचा प्रश्नच नाही.”
डिसेंबरच्या सुरुवातीला पुण्यातील एका कार्यक्रमातही मोहन भागवतांनी पंतप्रधान मोदींच्या जागतिक प्रतिमेचे कौतुक केले होते. ते म्हणाले, “जगभरात पंतप्रधान मोदींचे भाषण एवढ्या लक्षपूर्वक ऐकले जाते, कारण आज भारताची ताकद जगासमोर प्रकट होत आहे आणि हीच गोष्ट जगाला आकर्षित करत आहे.”