

Raj Thackeray kalyan violence case thane court hearing: कल्याण रेल्वे स्थानकावर 2008 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेदरम्यान उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणाची ठाणे रेल्वे न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे स्वतः न्यायालयात उपस्थित होते.
राज ठाकरे आणि इतर आरोपी कोर्टात उभे राहताच न्यायाधीशांनी थेट प्रश्न विचारला:
न्यायाधीश: “गुन्हा कबूल आहे का?”
राज ठाकरे: “मला गुन्हा कबूल नाही.”
यानंतर न्यायाधीशांनी सांगितले की, “तुम्ही सहकार्य केल्यास प्रकरण एका महिन्यात संपेल.” राज ठाकरेंनी तत्काळ उत्तर दिलं “मी पूर्ण सहकार्य करणार आहे.” काही मिनिटांतच संपूर्ण प्रक्रिया संपली.
राज ठाकरेंचे वकील ओंकार राजूरकर यांनी सांगितले:
कोर्टात राज ठाकरे हजर राहिले, परंतु पुढील तारखेस त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता नाही.
आज फक्त “गुन्हा मान्य आहे का?” हा औपचारिक प्रश्न विचारण्यात आला.
प्रकरण पुढील एका महिन्यात निकाली निघू शकते, अशी कोर्टाची सूचना आहे.
राज ठाकरे न्यायालयीन प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करतील.
2008 मध्ये रेल्वे भरतीच्या दिवशी, कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर हल्ले झाले, रेल्वे मालमत्तेचे नुकसान आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचे आरोप आहेत. या सर्व प्रकरणात राज ठाकरे आणि सात मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
या घटनांचा संदर्भ असा की, त्यावेळी राज ठाकरेंनी “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावून घेतल्या” असा मुद्दा मांडला होता. या वक्तव्यांनंतर वातावरण चिघळले आणि हिंसाचाराचे प्रकार घडले.
घटनेनंतर राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना अटक झाली होती.
काही काळानंतर त्यांना दिलासा मिळाला आणि त्यांची सुटका झाली.
केस आधी कल्याण कोर्टात चालू होती, नंतर ती ठाणे रेल्वे कोर्टात वर्ग करण्यात आली.
अनेक सुनावण्यांना आरोपी कोर्टात हजर राहिले नाहीत, त्यामुळे कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते.
राज ठाकरेंच्या वकिलांनी केलेल्या अर्जानंतर ते वॉरंट रद्द करण्यात आले.
कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार, सर्व सहकार्य मिळाल्यास हा जुना खटला पुढील एका महिन्यात संपण्याची शक्यता आहे.