

Pahalgam Terror Attack
श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रण रेषेवरील (LoC) अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार केला. पण या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारताच्या बाजूने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
"पाकिस्तानी सैन्याने सीमेवर रात्रभर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही," अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यातदेखील पाकिस्तानी सैन्याने पूंछ जिल्ह्यातील एलओसीवर भारतीय चौकीवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला होता. त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते.
गुरुवारी उधमपूर जिल्ह्यात संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली होती. यात विशेष दलाचा एक सैनिक शहीद झाला. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, बांदीपोरा जिल्ह्यात आज शुक्रवारी सकाळी भारतीय सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु झाली. दहशतवाद्यांच्या हालचालीबाबत मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या बांदीपोरा येथील कुलनार अजस परिसरात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. येथे चकमक सुरु आहे, अशी माहिती भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल ५८ दहशतवादी सक्रिय आहेत. यातील बहुतांश दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’चे आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आली.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. तर १७ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान हाय अलर्टवर आहेत.