

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानसमर्थित दहशतवादी गट ‘लष्कर-ए-तोयबा’चा (एलईटी) एक प्रॉक्सी गट, ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने (टीआरएफ) अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुरक्षा यंत्रणांसाठी धोक्याची घंटा वाजलीच आहे. मात्र, सूत्रांनुसार सध्याच्या घडीला जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल 58 दहशतवादी सक्रिय असून, यातील बहुतांशी दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’चे आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आली आहे. पहलगाम शहराजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेल्या चिंताजनक परिस्थितीत केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी इंटेलिजन्स ब्यूरोचे संचालक तपन डेका आणि रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे प्रमुख रवी सिन्हा यांच्यासोबत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली. या बैठकीत गुप्तचर यंत्रणेने ही महत्त्वाची माहिती शेअर केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये किमान 58 परदेशी दहशतवादी सक्रिय आहेत, त्यापैकी 35 ‘लष्कर’शी, 20 ‘जैश-ए-मोहम्मद’शी आणि 3 ‘हिजबुल मुजाहिद्दीन’शी संबंधित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांना दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल आधीच माहिती होती.
तरीही पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला, यामुळे त्रुटी उघड झाली असल्याचे संकेत आहेत. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरमधील काही भूतकाळातील घडामोडींवरही चर्चा झाली. यामध्ये गेल्या महिन्यात कुपवाडा येथे झालेल्या एका परदेशी दहशतवाद्याच्या हत्येचा समावेश आहे. गुप्तचर यंत्रणांनी हे पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या घुसखोरीचे लक्षण मानले आहे.
याशिवाय, बांदिपोरा येथे चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. एवढेच नाही, तर फेब्रुवारीमध्ये रियासी (जम्मू) येथे 260 राऊंड गोळ्या आणि चार रॉकेट जप्त करण्यात आले. पुलवामा आणि शोपियाँ येथे आयईडीदेखील जप्त करण्यात आले. हे सर्व जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवाया दर्शवते.
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी आणि पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी भारताने “ऑपरेशन आक्रमण” सुरू केले आहे. भारतीय हवाईदल मध्य प्रदेशातील विस्तीर्ण प्रदेशात युद्धाचा सराव करत आहे. राफेल लढाऊ विमानांच्या नेतृत्वात त्यांच्या लढाऊ विमानांचा ताफा सहभागी आहे. त्यात ‘राफेल’, ‘सुखोई-30’ विमाने सहभागी झाली आहेत. भारतीय हवाईदल मैदानी आणि पर्वतीय भागांसह विविध भूप्रदेशांत जटिल जमिनीवरील हल्ला मोहिमांचा सराव करत आहे. दक्षिण आशियाई शत्रूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘उल्का’ हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि ‘रॅम्पेज’, ‘रॉक्स’सारखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.